असे किती बोम्मई पाहिले… अमित शहा, मोदी त्यांना सरळ करतील, गुलाबराव पाटलांकडून धीर…
अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बोम्मई पाहिले आहेत, ते त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत अशी खात्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
जळगावः अमित शाह (Amit Shah) हे देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचे दोन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर (Maharashtra Karnataka Border issue) अवश्य तोडगा काढतील. असे किती बोम्मई त्यांनी पाहिले असतील. मोदी आणि शहा बोम्मईंना सरळ करतील, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सकाळीच सीमाप्रश्नावरून आक्रमक ट्विट केलं. महाराष्ट्राच्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेऊन काही फरक पडणार नाही, असं ट्वीट बसवराज बोम्मई यांनी केलं होतं. तर लवकरच कर्नाटकचे शिष्टमंडळही अमित शहांची भेट घेणार असल्याचं बोम्मई म्हणाले.
यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हमाले, ‘ अमित शहा यांच्या भेटीनंतरही काही फरक पडणार नाही, अशी भाषा म्हणजे उन्मादाची बाब आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत सर्वात मोठ्या पक्षाचे ते दोन वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत त्यांनी तडजोडीची भूमिका घेतल्यावरही आम्ही काहीच करू देणार नाही, याचा अर्थ याला रगड म्हटल जातं…
अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बोम्मई पाहिले आहेत, ते त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत अशी खात्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. आम्ही राज्यात एकत्र आहोत, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आमची अस्मिता एकच आहे, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय.