Gunratna Sadavarte : ‘राष्ट्रपती पदासाठी उंची, बौद्धिक पातळी लागते’, वकील गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा
वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधलाय. राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, बौद्धिक पातळी लागते, असा टोला सदावर्ते यांनी पवारांना लगावलाय. ते गुरुवारी अकोल्यात बोलत होते.
अकोला : सध्या राष्ट्रपती पदासाठी (Presidential Election) विरोधकांकडून उमेदवाराची शोधमोहीम सुरु आहे. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राजधानी दिल्लीत सर्वच राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती. त्यात 17 पक्ष सहभागी झाले. या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रपती पदाचा उमेदवार होण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, पवार यांनी तो नम्रपणे नाकारला. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसनं पवार हे राष्ट्रपदी पदाचे उमेदवार असतील तर काँग्रेस पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असेल अशी घोषणा केली होती. त्यामुळे पवारांचे नाव अधिक चर्चेत आले होते. याच चर्चेच्या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधलाय. राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, बौद्धिक पातळी लागते, असा टोला सदावर्ते यांनी पवारांना लगावलाय. ते गुरुवारी अकोल्यात बोलत होते.
गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांना टोला
‘मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा होते, आयएएस होण्यासाठीही परीक्षा असते. मला वाटतं नाव वाजवण्यासाठी चर्चा ठीक आहे. परंतु राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी आवश्यक असते. मला वाटतं शरद पवार यांचं नाव चर्चेतून वाजवलं जात आहे. राष्ट्रपती पदावर उंची गाठलेली माणसं होती. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार. ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे कुठली उंची आहे? असा खोचक सवाल करत सदावर्ते यांनी शरद पवारांवर टीका केलीय.
पवारांनी प्रस्ताव का नाकारला?
राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, शरद पवार यांनी तो नम्रपणे नाकारला. त्याबाबतचं ट्वीट पवार यांनी केलंय. दिल्लीत झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून माझं नाव सुचवल्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. पण नम्रपणे सांगतो की मी माझ्या उमेदवारीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सेवा सुरु ठेवण्यात मला आनंद आहे, असे ट्विट शरद पवार यांच्याकडून करण्यात आलंय.
I am happy to continue my service for the well-being of the common man. pic.twitter.com/48hccVgjCa
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 15, 2022
राजनाथ सिंहांचा शरद पवारांना फोन
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकच उमेदवार असावा आणि ही निवडणूक बिनविरोध पार पडावी म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी याबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी फोनवरून या संदर्भात चर्चाही केली आहे. तसेच काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांशी राजनाथ सिंह यांनी संवाद साधला.