पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि महाराष्ट्र सरकारवर थेट बोट ठेवणारे बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar Pandey) आजही सर्वांना आठवतात. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेऊन, गुप्तेश्वर पांडे राजकारणात उतरले. त्यांनी भाजप म्हणता म्हणता नितीश कुमारांच्या जेडीयूमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांना तिकीट काही मिळालं नाही. त्यामुळे तेलही गेलं, तूपही गेलं अशी परिस्थिती पांडेंची झाली.
गुप्तेश्वर पांडे सध्या काय करतात, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. सध्या गुप्तेश्वर पांडे हे भगव्या कपड्यांमध्ये पाहायला मिळतात. मी आता देवाला समर्पित झालो आहे, असं गुप्तेश्वर पांडे यांनी एका मुलाखतीत सांगितलं. काळानुसार माणसाचं आयुष्य बदलतं, तसं माझंही बदललं आहे, मी आता कथावाचक झालो आहे, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले.
बिहारचे तत्कालिन पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी 22 सप्टेंबर 2020 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली. बिहार निवडणुकांच्या तोंडावर व्हीआरएस (व्हॉलंटरी रिटायरमेंट फ्रॉम सर्व्हिस) घेतल्याने पांडे राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करण्याची शक्यता बळावली होती. गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी VRS घेणाऱ्या पांडेंना तिकीट मिळालंच नाही. त्यामुळे त्यांनी आता दुसरा रस्ता निवडला. ते आता अध्यात्माच्या मार्गाला लागले आहेत. “माझं इथे मन रमतंय. मन:शांती आहे. आत्म्याचा खुराक हाच तर आहे. मी आता स्वत:ला ईश्वराला समर्पित केलं आहे. देवाच्या इच्छेनेच सर्व काही घडत आहे. माझी काहीह इच्छा नाही” असं गुप्तेश्वर पांडेंनी एका स्थानिक न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
जीवनात काहीही शाश्वत नाही. ज्याच्याकडे जेव्हढं मोठं पद, तो तेव्हढाच दु:खी असतो. आनंद तर केवळ ईश्वराच्या मार्गावर आहे. ईश्वरप्राप्तीचाच प्रयत्न करत आहे. आता राजकारणात येण्याची तसूभरही इच्छा नाही. ईश्वराच्या चरणी लीन होणं हीच माझी इच्छा आहे, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले.
गुप्तेश्वर पांडे म्हणाले, “राजकारणात येण्यासाठीच मी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती अर्थात VRS घेतली होती. मी निवडणूक लढू इच्छित होतो, मात्र मला तिकीटच मिळालं नाही. तिकीट न मिळण्यासाठीही अनेक कारणं असतात. त्यासाठी मी स्वत:लाच कारणीभूत ठरवतो, इतर कोणालाही दोष देऊ इच्छित नाही. मला तिकीट मिळालं नाही, त्यामुळे मी राजकारणात येऊ शकलो नाही, त्यामुळे तो चॅप्टरच बंद झाला. आता ती इच्छाही संपली”
गुप्तेश्वर पांडे म्हणाले, 15 ते 22 पर्यंत मी अयोध्येत कथावाचन केलं. मात्र मी संन्यासी झालो नाही. ना मी भगवी वस्त्रं परिधान केली आहेत. धोतर कुर्ता घालतो. त्यामध्ये लाल, पांढरा, भगवा अशा कुर्त्यांचा समावेश असतो. परिवर्तन हे आतून व्हायला हवं, बाहेरील परिवर्तनाला महत्त्व नाही. माझ्या मनात कुणाबद्दल द्वेष-गैरसमज नाहीत. सर्वांचं भलं होवो, हीच माझी इच्छा आहे, असं पांडे म्हणाले.
गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म 1961 मध्ये बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गेरुबंध गावात झाला. पांडे यांनी पाटणा विद्यापीठातून संस्कृतमध्ये पदवी संपादन केली. विशेष म्हणजे संस्कृतमधून त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्णही झाले. त्यानंतर ते आयकर अधिकारी झाले. दुसर्या प्रयत्नात आयपीएस परीक्षा पास होऊन त्यांनी पोलिस सेवेत प्रवेश केला.
गुप्तेश्वर पांडे यांनी याआधी 2009 मध्येही व्हीआरएस घेतला होता. भाजपच्या तिकिटावर बिहारमधील बक्सर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांची महत्त्वाकांक्षा अपुरी राहिल्याने नऊ महिन्यांनी बिहार सरकारकडे त्यांनी आपली निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली.
नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यावेळी पांडे यांचा विनंती अर्ज मंजूर केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते बिहार पोलिस महासंचालकपदी रुजू झाले होते.
मागील वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी ते देशभरात चर्चेत होते.
गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली
संबंधित बातम्या
VIDEO | ‘बिहार के रॉबिनहूड’…, स्वेच्छानिवृत्ती स्वीकारताच गुप्तेश्वर पांडेंवर रापचिक सॉन्ग
Gupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, राजकीय पक्ष ठरला!