लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजपाला अडचणींचा सामना करावा लागतोय. सध्या भाजपा हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांच्या निवडणूक तयारीमध्ये व्यस्त आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच पक्षात जणून राजीनाम्याची लाटच आली आहे. हरियाणा भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. विधानसभा निवडणुकीआधीच भाजपाला मोठे झटके बसले आहेत. निवडणुकीसाठी बुधवारी पहिली यादी जाहीर झाली.
हरियाणा बीजेपी ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आणि माजी मंत्री कर्णदेव कंबोज यांनी भाजपाच्या सर्वपदांचा राजीनामा दिला आहे. इंद्री विधानसभा मतदारसंघातून तिकीट कापल्याने कंबोज पक्षावर नाराज होते. त्यांनी पक्षावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सर्वपदांचा राजीनामा दिलाय.
दादरी किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष विकास उर्फ भल्लेने भाजपामधून राजीनामा दिलाय.
रतियामधून भाजपा आमदार लक्ष्मण नापा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय.
सोनीपतमधुन भाजपा युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि विधानसभा निवडणूक प्रभारी अमित जैन यांनी राजीनामा दिलाय.
जेजेपीमधून भाजपात प्रवेश करणारे माजी मंत्री अनूप धानक यांना उकलानामधून भाजपाने तिकीट दिलं. त्यामुळे नाराज झालेले भाजपा नेते शमशेर गिल यांनी राजीनामा दिला.
हरियाणा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुखविंदर मांडी यांनी भाजपामधून राजीनामा दिलाय.
हिसारमधून नेते दर्शन गिरी महाराज यांनी भाजपामधून राजीनामा दिलाय
भाजपाचे वरिष्ठ नेत्री सीमा गैबीपुर यांनी पक्षाच्या सर्वपदांचा तात्काळ राजीनामा दिलाय.
भाजपाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 67 उमेदवारंची पहिली यादी जाहीर केली. सीएम नायब सिंह सैनी लाडवामधून निवडणूक लढणार आहेत. हरियाणाचे स्पीकर ज्ञान चंद गुप्ता पंचकूलामधून, हरियाणाचे माजी भाजपा अध्यक्ष ओम प्रकाश धनखड़ बादली येथून, पूर्व स्पीकर कंवर पाल गुर्जर जगाधरीमधून, पूर्व गृह मंत्री अनिल विज अंबाला कँट आणि माजी खासदार सुनीता दुग्गल रतियामधून निवडणूक लढतील.