कोल्हापूर : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज कोहापूरला जात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर तिसरा मोठा आरोप केलाय. मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने तब्बल पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. सोमय्या यांच्या या आरोपानंतर आता हसन मुश्रीफांनीही पत्रकार परिषद घेत सोमय्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Hasan Mushrif responds to Kirit Somaiya’s allegation of Rs 1,500 crore scam)
‘किरीट सोमय्या यांनी साखर कारखान्याबाबत खोटी माहिती दिली. आता माझ्या जावयाचं आणि कुटुंबाचं नाव घेत आहेत. हा प्रकार निषेधार्ह आहे. मी आतापर्यंत त्यांच्या आरोपांबाबत खुलासा केला आहे. राजकीय आणि सामाजिक जिवनात आपण 25 वर्षे काम केलेलं असतं आणि कुणीतही उठावं आणि चिखलफेक करावी हे आम्ही कदापीही सहन करणार नाही. आता जो त्यांनी आरोप केलाय की ग्रामविकास विभागात अनेक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागाकडे एक पत्र पाठवलं होतं. अनेक ग्रामपंचायतीत पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे कंत्राटदार हे जीएसटी घेतात पण जीएसटी भरत नाहीत. टीडीएस कापत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेला मोठा दंड भरावा लागतो. त्याबाबत राज्यभरात एक युनिफॉर्म व्यवस्था असावी. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत जे लेखा परिक्षक काम करतात. त्यांचे काय पैसे द्यायचे? याबाबत सुसुत्रता असावी. म्हणून ग्रामविकास विभागाच्या या प्रस्तावाला मी मंजुरी दिली. माझ्या माहिती प्रमाणे जानेवारीमध्ये आपण काही अटीशर्थींसह त्याची निविदा प्रसिद्ध केली. त्यात कशा प्रकारच्या कंपन्या असाव्या, कसं काम करावं. त्यावेळी आपण हे पहिल्यांदाच सांगितलं की हे ऐच्छिक असेल’.
‘निविदेद्वारे येणारे दर जर जास्त असतील आणि तुम्हाला कमी दराने काम करायला कुणी तयार होत असेल तर कमी दराने करा. म्हणजे हे ऐच्छिक ठेवलं होतं. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लेखापरिक्षणात सुसुत्रता यावी म्हणून आपण दर निश्चित केले. मात्र आपण हे बंधनकारक केलं नाही. हा निधी आपल्या स्वनिधीमधून किंवा कुठल्याही निधीमधून ते देतील. म्हणजे राज्य सरकारनं एकत्रितपणे यातील कुठलीही भूमिका ठेवली नाही. जर भ्रष्टाचार करायचा असता तर राज्य सरकारनं आपल्याकडे पैसे घेतले असते आणि ते दिले असते. ऑर्डर निघाल्यानंतर कंपनीला एक पैसा अदा करण्यात आलेला नाही, मग यांनी पंधराशे कोटी रुपये घोटळ्याचा जावईशोध कुठून लावला?’ असा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे.
सोमय्यांनी आज तिसरा घोटाळा जाहीर केला. दुसऱ्या घोटाळ्याचा आज त्यांनी काही उल्लेख केला नाही. त्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. पण त्यांनी पुन्हा अशी वक्तव्ये करू नये म्हणून त्यांच्यावर बंदी आणण्याची याचिकाही दाखल केली होती. आजच त्याची सुनावणी सुरू होती. पण त्याची नोटीस त्यांनी घ्यायला नकार दिला. त्यामुळे या प्रकरणावर सुनावणी होऊन त्यावर एकतर्फी निर्णय येण्याची शक्यता आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
इतर बातम्या :
Hasan Mushrif responds to Kirit Somaiya’s allegation of Rs 1,500 crore scam