मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता, कॅबिनेटची बैठक बोलावली
कुमारस्वामी यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर कुमारस्वामी राजीनामा देऊ शकतात. बुधवारी सायंकाळी कुमारस्वामी यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्याशीही चर्चा केली.
बंगळुरु : कर्नाटकात भाजपचं ऑपरेशन कमळ यशस्वी होण्याची शक्यता आहे. जवळपास 15 ते 16 आमदार आणि अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी स्वतः राजीनामा देण्याची शक्यता आहे. कुमारस्वामी यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर कुमारस्वामी राजीनामा देऊ शकतात. बुधवारी सायंकाळी कुमारस्वामी यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्याशीही चर्चा केली.
कुमारस्वामी कॅबिनेटच्या बैठकीनंतर राजीनाम्याची घोषणा करु शकतात, किंवा सरकार वाचवण्यासाठी त्यांच्याकडे असलेले पर्याय जाहीर केले जातील. विशेष म्हणजे काँग्रेसचं सरकार आल्यास त्यांना पाठिंबा देण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती आहे. कारण, माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांना डावलल्यामुळे काँग्रेसचे अनेक आमदार नाराज आहेत.
आणखी दोन आमदारांचा राजीनामा
कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष पक्षपातीपणा करत राजीनामा स्वीकारत नसल्याचा आरोप करत आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यातच काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसच्या मिळून आतापर्यंत 16 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. पण विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय अजून राखून ठेवलाय.
मुंबईत नाट्यमय घडामोडी
काँग्रेसच्या राजीनामा दिलेल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. या आमदारांचं मन वळवण्यासाठी काँग्रेसचे नेते डी शिवकुमार यांनी हॉटेलमध्ये बुकिंग केलं आणि आत जाण्याचा प्रयत्न केला. पण शिवकुमार यांना आत जाऊ दिलं नाही. पोलिसांनी यानंतर जमावबंदी लागू केली आणि जमावबंदी मोडल्याप्रकरणी शिवकुमार यांना ताब्यात घेतलं. सध्या त्यांना सोडलं असून बंगळुरुसाठी रवाना करण्यात आलंय.