मुंबई : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज दोन महत्त्वपूर्ण सुनावण्या होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न रखडला आहे. आज ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या याच निर्णयावर पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे (Election)गणित अवलंबून असल्याने अवघ्या राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे गटाविरोधात ज्या विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यावर देखील आज तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुणावणी होणार आहे. यामध्ये व्हीप मोडलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, राज्यपालांनी शिंदे गटाला सत्ता स्थापन करण्यास दिलेली परवानगी, विधानसभा अध्यक्षांची निवड तसेच विधानसभेत शिंदे गटाने जिकंलेले बहुमत अशा विविध याचिंकावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय घडणार? शिवसेनेला आज तरी दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. ओबीसी आरक्षणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगताना दिसले. महाविकास आघाडीमुळेच ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहिल्याचा आरोप भाजपाच्या वतीने करण्यात आला, तर केंद्र सरकार ओबीसी आरक्षणाबाबत सहकार्य करत नसल्याचा आरोप तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात येत होता. शेवटी हा लढा आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. आज या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
ओबीसीच्या आरक्षणावर 12 जुलैरोजी सुनावणी झाली होती. या सुनावणीमध्ये कोर्टाने काही महत्त्वाचे निर्देश दिले होते. सध्या नव्या निवडणुका जाहीर करू नका, मात्र ज्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत त्या थांबवता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. दरम्यान राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाशी संबंधित असलेल्या बांठिया आयोगाचा अहवाल देखील न्यायालयात सादर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आज शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या गटाविरोधात ज्या विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, त्या याचिकेवर देखील आज सुनावणी होणार आहे. या तीन सदस्यीय खंडपीठामध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हीमा कोहली यांचा समावेश आहे.