Hingoli | हिंगोलीत बबनराव थोरातांकडे आता संपर्कप्रमुख पद, हेमंत पाटील, संतोष बांगरांच्या बंडखोरीनंतर मोठं खांदेपालट
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी बंडखोरी केल्यांनंतर माजी खासदार सुभाष वानखेडे यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. तर आमदार संतोष बांगर यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनायक भिसे यांना शिवसेनेत सामावून घेतलंय.
हिंगोलीः शिवसेनेत 40 आमदार आणि 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अधिक जोमाने शिवसेना बांधणीच्या कामाला लागले आहेत. अनेक कडवट शिवसैनिकांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात येत असून ठिक ठिकाणी खांदेपालट केले जात आहेत. हिंगोली शिवसेना (Hingoli Shivsena) संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बबनराव थोरात (Babanrao Thorat) यांची निवड शिवसेना संपर्कप्रमुख पदी करण्यात आली आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यात सदस्य नोंदणी आणि एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र भरून देण्याच्या कामात गती येणार आहे.
सुभाष वानखेडेंचा शिवसेनेत प्रवेश
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी बंडखोरी केल्यांनंतर माजी खासदार सुभाष वानखेडे यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. तर आमदार संतोष बांगर यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनायक भिसे यांना शिवसेनेत सामावून घेतलंय. कळमनुरी विधानसभेत बांगर यांना मात देण्यासाठी मागच्या निवडणुकीवेळी दुसऱ्या स्थानी राहिलेल्या अजित मगर यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यात बबनराव थोरात यांची हिंगोली संपर्क प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर हिंगोलीतील शिवसैनिकांत चैतन्य निर्माण झाल्याचं चित्र आहे.
संतोष बांगरांना मंत्रिपद मिळणार?
एकनाथ शिंदेंच्या गटात ऐनवेळी प्रवेश करणाऱ्या संतोष बांगरांनी राज्यातील सर्व जनतेचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी शेकडो कार्यकर्ते सोबत घेत हिंगोली ते मुंबई असं त्यांनी केलेलं भव्य शक्तप्रदर्शनही राज्यात चर्चेचा विषय ठरलं. शिंदेंच्या बंडामुळे आधी शिवसैनिकांना भावनिक साद घालणाऱ्या संतोष बांगरांच्या बदलत्या भूमिकांकडे राज्याचं लक्ष आहे. मंत्रिपद मिळण्यासाठी संतोष बांगर यांनी मुंबईत एवढं मोठं शक्तिप्रदर्शन केल्याचंही बोललं जातंय. यावर संतोष बांगर यांनीही प्रतिक्रिया दिली होती. मंत्रिपद कुणाला नको. ते मिळालं तर माझ्यात दहा हत्तींचं बळ येईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच मंत्रिपदाच्या अपेक्षेनं कुठलंही काम करत नाही. माझ्या नेत्यांना माझ्यावर विश्वास असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आदेश देतील त्या आदेशाचं मी पालन करणारा अडवट शिवसैनिक आहे. शिंदे साहेबांच्या मनात असेल तर माझ्यावर जबाबदारी देतील, पण मी स्वतः मंत्रिपद मागणार नाही, अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली होती.