चित्रा वाघ-रुपाली चाकणकरांमध्ये वाक्-युद्ध, हिंगणघाट प्रकरणावरुन आमनेसामने
पीडितेला न्याय मिळणं आणि महिला अत्याचारांच्या घटना रोखणं हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे," असं रुपाली चाकणकर (Hinganghat case) म्हणाल्या.
पुणे : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या ठिकाणी प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात (Hinganghat case) आला. या घटनेमुळे सर्व महाराष्ट्रात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याप्रकरणी समाजाच्या विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मात्र राज्यातील दोन प्रमुख राजकीय पक्षातील वरिष्ठ महिला नेत्यांमध्ये या प्रकरणावरुन वाकयुद्ध रंगलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात यावरुन वाकयुद्ध सुरु आहे. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर या ‘बावळट’ आहेत, अशी वैयक्तिक पातळीवर टीका केली. तर त्याला प्रत्युत्तर देताना रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ या वैफल्यग्रस्त अवस्थेत असल्याचं म्हटलं आहे.
हिंगणघाट प्रकरणातील पीडित तरुणी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित तरुणीला सरकार मदत करत नसल्याचा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी भाजप सत्ता गेल्याने हताश झाल्याने विनाकारण आरोप करत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या पीडित मुलीला न्याय मिळण्याआधीच राजकीय वाद सुरु झाला. चाकणकरांच्या या प्रतिक्रियेनंतर वाघ त्यांना थेट ‘बावळट’ असेही म्हणाल्या.
चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. तसेच यापूर्वी रुपाली चाकणकर यांनी आपल्या फेसबूक पेजवर ही चित्रा वाघ यांना टोला लगावला होता. “चित्रा वाघ, थोडीफार माहिती घेऊन बोलत जा, वाईट वाटतंय तुम्हाला असं पाहून, स्वतःच्या अस्तित्वासाठीची ही केविलवाणी धडपड. कायम सत्ताधारींवर टीका करावी लागतेय तुम्हाला, जिकडे जाता तिकडे सत्तेतून पायउतार व्हावे लागतंय……..पायगुण.
विरोधक म्हणून शुभेच्छा पण अशा ठिकाणी राजकारण करू नका, जिथे माणसाच्या जगण्याचा संघर्ष चालू असतो आणि सर्व महाराष्ट्र त्यासाठी प्रार्थना करतोय. आपण राजकारण करताय. पण मला या वैयक्तीक टीकेत पडायचं नाही. चित्रा वाघ यांना महत्व देण्यासारखं अजिबात काही नाही. पीडितेला न्याय मिळणं आणि महिला अत्याचारांच्या घटना रोखणं हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे,” असं रुपाली चाकणकर (Hinganghat case) म्हणाल्या.
दोन प्रमुख राजकीय पक्षातील महिला नेत्यांमध्ये रंगलेलं हे वाकयुद्ध दुर्देवी असल्याचं मत इतर महिला नेत्या व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातील महिला प्रचंड असुरक्षित असताना दोन जबाबदार नेत्यांनी अशा पध्दतीने वैयक्तीक पातळी टीका करणं अयोग्य आहे. चित्रा वाघ यांनी चाकणकरांवर वैयक्तिक टीका करण्याची आवश्यकता नव्हती, असं मत मनसेच्या रुपाली पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. असे असताना ते रोखण्यासाठी प्रयत्न सोडून प्रमुख पक्ष्याच्या महिला नेत्यांनी एकमेकींची उणीदुणी काढत वैयक्तिक टीका टिप्पणी करणं हे केवळ दुर्वेवी नाही, तर प्रगल्भ समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणं आहे. राजकारणात महिलांची संख्या आधीच कमी आहे.
महिला नेत्यांनी तरी संवेदनशीलपणे कोणतंही पक्षीय राजकारण न करता महिला अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण इथं मात्र, एकमेकींवर वैयक्तिक टीका करण्यात काहींना समाधान वाटण, हे महिलांचाही महिलांच्या पुढील राजकारणासाठीही धोकादायक (Hinganghat case) आहे.