राडा!! भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली, CCTV फुटेज उघड Video
एवढी मोठी घडना घडल्यानंतरही त्याची साधी पोलिसात तक्रार कशी दाखल झाली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होतंय.
रमेश चेंडके, हिंगोलीः फक्त दिल्लीतच नाही गल्लीतलं, स्थानिक पातळीवरचं राजकारणही तितकचं गंभीर असतं. गाव, तालुका, जिल्हा पातळीवरच्या पदांसाठी होणारे भांडण तंटे, हेवे दावे महाराष्ट्राला नवे नाहीत. सहकार क्षेत्रातील राजकारण तर अभ्यासाचच विषय.. हिंगोलीत (Hingoli) अशाच प्रकारचा वाद उफाळून आलाय. औंढा नागनाथ (Aundha nagnath) येथील एका बँकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून ठाकरे (Thackeray) विरुद्ध भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस होती. ही धुसफूस अखेर वाद आणि हाणामारीच्या रुपातून बाहेर आली. हिंगोलीत घडलेली ही घटना कालची अर्थात गुरुवारची असली तरी तिचं सीसीटीव्ही फुटेज शुक्रवारी बाहेर आलंय. एवढी मोठी घडना घडल्यानंतरही त्याची साधी पोलिसात तक्रार कशी दाखल झाली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होतंय.
काय घडला नेमका प्रकार?
हिंगोलीतील औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील ही घटना आहे. या भागात डॉ. जयप्रकाश मुंदडा या ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्याचा दबदबा आहे. डॉ. जयप्रकाश मुंदडा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून हे प्रकरण तापलंय. या निवडीवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे विरुद्ध भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. याचं सीसीटीव्ही फुटेज नुकतंच समोर आलं आहे.
वादाचं कारण काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या पुतण्याला उपाध्यक्ष पद देण्यावरून हा वाद सुरु झाला. अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु होती. अध्याशी अधिकारी सहाय्यक निबंधक मुकुंद देशमुख यांच्यासमोर राजाभाऊ मुसळे, गोपाल अग्रवाल, अंकुश आहेर आदी मंडळी बसली होती. अचानक तेथे बँकेचे संचालक दीपक मुंदडा हे कार्यकर्त्यांना घेऊन आले. उपाध्यक्ष पद निवडीवरून या वादाला सुरुवात झाली. केबिनमध्ये घुसल्यानंतर वाद आणि धक्काबुक्की सुरु झाली.
यातील काही मंडळींनी वाद सोडवायचा प्रयत्न केला. मात्र गोपाल अग्रवाल यांच्यावर मुंदडा समर्थक तुटून पडल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे हिंगोलीच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
ठाकरे गटाचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचे पुतळे दीपक मुंदडा यांना बँकेचे उपाध्यक्ष पद द्यायचे होते. ते पद ऐनवेळी दुसऱ्याला दिल्याने माजी मंत्री डॉक्टर जय प्रकाश मुंदडा यांच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचा आरोप केला जातोय. एवढा मोठा प्रकार होऊनही पोलिसात साधी तक्रार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.