काँग्रेसच्या दोनपैकी एका खासदाराची निवडणुकीतून माघार
मुंबई: महाराष्ट्रातील विद्यमान दोनपैकी एका काँग्रेस खासदाराने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव हे यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. राजीव सातव यांच्याकडे गुजरात काँग्रेसची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस हायकमांडने त्यांची ही मागणी मान्य केल्याने आता हिंगोलीत काँग्रेस दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे. लोकसभेच्या 2014 च्या […]
मुंबई: महाराष्ट्रातील विद्यमान दोनपैकी एका काँग्रेस खासदाराने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव हे यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. राजीव सातव यांच्याकडे गुजरात काँग्रेसची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस हायकमांडने त्यांची ही मागणी मान्य केल्याने आता हिंगोलीत काँग्रेस दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे.
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी एक नांदेड आणि दुसरी अत्यंत कमी फरकाने जिंकलेली जागा म्हणजे हिंगोली. पण यावेळी हिंगोलीत काँग्रेसचं चित्र थंड आहे. विद्यमान खासदार राजीव सातव यांच्यावर गुजरातची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचा चेहरा पाहणंही हिंगोलीकरांना दुर्मिळ झालंय. राजीव सातवांनी निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर ढकलला होता.
काँग्रेसची संभावित नावं
राजीव सातव यांनी निवडणूक न लढल्याचा निर्णय घेतल्याने हिंगोलीत उमेदवार कोण असा प्रश्न आहे. कळमनुरीचे काँग्रेस आमदार संतोष टारफे हे काँग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. शिवाय वकील शिवाजीराव जाधव यांनाही ऐनवेळी काँग्रेसची उमेदवारी मिळू शकते. शिवाजीराव जाधव गेल्या निवडणुकीत भाजपकडून लढणार होते. त्यांनी प्रचारही सुरु केला होता. पण युतीत ही जागा शिवसेनेला गेल्याने त्यांची निराशा झाली.
शिवसेनेकडून हेमंत पाटील
शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. 2014 मध्ये शिवसेनेचे -सुभाष वानखेडे यांना 4 लाख 65 हजार 765 इतकी मतं पडली होती. तर काँग्रेसचे विद्यमान खासदार राजीव सातव यांना 4 लाख 67 हजार 397 मतं मिळाली होती. मोदी लाटेत 1632 मतांनी राजीव सातव यांचा विजय झाला. त्या निवडणुकीत मुंदडा गटाकडून राजीव सातव यांना छुप्या पद्धतीने मदत करण्यात आल्याचा आरोप होता. कारण, हिंगोलीत शिवसेनेचे दोन गट होते, ज्याचा फटका उमेदवाराला बसला. सुभाष वानखेडे सध्या भाजपात आहेत. त्यामुळे शिवसेनेने नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली.
संबंधित बातम्या