Santosh Bangar Video : बंडखोरांच्या बायकांवरुन टीका करणारे संतोष बांगर यांनीच बंडखोरी केली! पाहा नेमकं काय म्हणाले होते?
बहुमत चाचणीपूर्वीच शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते बंडखोरांवर टीका करताना दिसत आहेत.
मुंबई: आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी आहे. मात्र बहुमत चाचणीपूर्वीच शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. बांगर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी शिवसेनेचे (shivsena) उमेदवार राजन साळवी यांना मतदान केले. मात्र आज बहुमत चाचणीपूर्वीच ते शिंदेंच्या गटात सहभागी झाले आहेत. संतोष बांगर यांनी तब्बल 13 दिवसांनी बंडखोरी केली आहे. संतोष बांगर यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ (Video) आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बांगर यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली होती. तसेच त्यांना परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र आता बांगर हेच शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
काय म्हटलं होतं बांगर यांनी?
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने पाठिंबा दिला होता. हे आमदार शिवसेनेला सोडून शिंदे गटात सहभागी झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर बांगर यांनी आमदारांना पुन्हा पक्षात येण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. बंडखोराच्या बायका म्हणतील, ज्या पक्षाने यांना मोठं केले तोच पक्ष यांनी सोडला. मला कधी सोडतील हे कळायचं देखील नाही. तसेच बंडखोरांच्या मुलांचे लग्न देखील होणार नाहीत. ज्या लोकांनी बंडखोरी केली त्यांच्या मुलांना कोण बायको देणार असं बांगर यांनी म्हटले होते. तसेच तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात येताल तेव्हा तुम्हाला रस्त्याने फिरणे देखील कठिण होईल. लोक काय काय फेकून मारतील हे सांगता येत नाही, असे बांगर यांनी म्हटले होते. मात्र आता बांगर हेच शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यानंतर त्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे.
आज बहुमत चाचणी
आज शिंदे सरकारचा विश्वासदर्शक ठराव आहे. काल विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे विजयी झाले. प्रस्तावाच्या बाजुने 164 तर विरोधात 107 मते पडली. दरम्यान आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी आहे. बहुमत चाचणी आम्ही बहुमतांच्या आकड्यापेक्षाही अधिक संख्येने जिकू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.