हिंगोलीत संतोष बांगरांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, संतोष टारफे, अजित मगर यांचा शिवसेना प्रवेश
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आधी मी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार असल्याच्या शपथा संतोष बांगर यांनी घेतल्या होत्या. मात्र शिंदे यांच्या बहुमत चाचणीला ऐनवेळी आपण शिंदे गटात शामिल होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
हिंगोलीः हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेने मोठी खेळी खेळली आहे. येथून एकनाथ शिंदे गटातील संतोष बांगर (Santosh Bangar) यांना शह देण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे (Santosh Tarfe) यांचा आज शिवसेनेत प्रवेश झाला आहे. मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संतोष टारफे यांना शिवबंधन बांधण्यात आलं. हिंगोली ते मुंबई असं मोठं शक्तिप्रदर्शन करणारे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्यासाठी हे मोठं आव्हान करण्याची शक्यता आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत संतोष बांगर यांना संतोष टारफे यांनीच कडवी झुंज दिली होती. टारफे यांनी ही निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. आता त्यांनाच पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्याविरोधात मोठी खेळी केली आहे. टारफे यांच्यासोबतच वंचित आघाडीचे अजित मगर (Ajit Magar) यांनीही आज शिवसेना प्रवेश केला. यापूर्वी काँग्रेस नेते सुभाष वानखेडे यांनाही शिवसेनेत प्रवेश देऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा ढाण्या वाघ पुन्हा जागा झालाय, असा संदेश दिला होता. वानखेडे हे आधी शिवसेनेत होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
कोण आहेत संतोष टारफे?
संतोष टारफे हे आदिवासी नेते आहेत. कळमनुरी विधानसभा मतदार संघात आदिवासी मतदारांचाही मोठा वर्ग आहे. मूळ काँग्रेसचे नेते असलेल्या टारफे यांनी 2019 मध्ये संतोष बांगर यांना विधानसभेत आव्हान दिलं होतं. बांगर यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते अजित मगर यांना मिळाली होती. त्यानंतर तिसर्या क्रमांकावर संतोष टारफे यांना मते मिळाली होती. आता या दोघांनाही शिवसेनेत घेतल्याने संतोष बांगर यांना मोठा शह मिळणार आहे.
संतोष बांगरांसमोर आव्हान
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आधी मी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार असल्याच्या शपथा संतोष बांगर यांनी घेतल्या होत्या. मात्र शिंदे यांच्या बहुमत चाचणीला ऐनवेळी आपण शिंदे गटात शामिल होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने मतदानही केले. त्यामुळे बांगर यांचा हा शिंदेगटातील प्रवेश शिवसेनेला जिव्हारी लागलेला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी बांगर यांनी काढलेली मोठी रॅलीही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ठरली होती. आता शिवसेनेने त्यांना कडवी फाईट देण्याचं ठरवलेलं दिसतंय.
अजित मगर यांचाही प्रवेश
माजी आमदार टारफे यांच्या सोबत शेतकरी नेते अजित मगर यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला. अजित मगर ह्याना 2019 च्या निवडणूकित विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी पराभूत केले होते. अजित मगर हे वंचित बहुजन आघाडी च्या तिकिटावर निवडणूक लढले होते. माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी शिवसेनेत प्रवेश केला नंतर येणाऱ्या काळात विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.