अर्ध्या वाटेत मातोश्रीवरून अनिलभाऊंचा फोन… हिंगोलीत परतणारे आमदार संतोष बांगर माघारी फिरले, मुंबईत काय हालचाली?
एकिकडे एकनाथ शिंदेंची सेना वाढता वाढता वाढे... अशा गतीने अधिक बलवान होत चाललीय तर दुसरीकडे वर्षा सोडून मातोश्रीवर गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हातची सत्ताच काय तर पक्षही जाण्याची स्थिती उद्धवली आहे. त्यामुळे मातोश्रीवर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.
हिंगोलीः हिंगोलीच्या (Hingoli)वाटेवर असताना अर्ध्या रस्त्यातच मातोश्रीवरून फोन आला. तुम्हाला परत मातोश्रीवर बोलावण्यात आलं आणि हिंगोलीत परतणारे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) माघारी फिरले. पुन्हा मुंबईच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरु केली आहे. बंडखोरांच्या फौजेत शामिल न होता उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) निष्ठावंत राहिलेले आमदार म्हणून कळमनुरीचे संतोष बांगर यांचा एकिकडे हिंगोली शिवसेनेच्या वतीने मोठा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारीही केली होती. मात्र तिकडे शिवसेनेचं केंद्र असलेल्या मातोश्रीवर काही वेगळ्याच घडामोडी सुरु आहेत. अर्ध्या वाटेवर असलेल्या शिवसेना आमदार संतोष बांगर यांना आता परत मातोश्रीवर बोलावण्यात आल्याने तिकडे नेमकी काय खलबतं सुरु आहेत, याचा अंदाज घेतला जात आहे.
सोशल मीडियावर दोन पोस्ट
आमदार संतोष बांगर हे हिंगोलीत येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठीची एक पोस्ट हिंगोलीतील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर काहीच तासात त्याच कार्यकर्त्याची दुसरी पोस्ट आली. काही कारणास्तव संतोष बांगर यांचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. संतोष बांगर हे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतच वास्तव्यास होते. आज सकाळी ते मुंबईतील हॉटेल रेगीन्स येथून हिंगोलीच्या दिशेने निघाले मात्र त्यांचा हा प्रवास अर्ध्यातूनच थांबवावा लागला. मातोश्रीवरून बोलावणं आल्यामुळे ते माघारी फिरले. त्यामुळे मातोश्रीवर नेमक्या काय हालचाली सुरु आहेत, याची चिंता कार्यकर्त्याना लागली आहे.
अनिलभाऊंनी का बोलावलं?
हिंगोलीच्या वाटेवर असताना अर्ध्या वाटेतून परत जाणारे आमदार संतोष बांगर यांना आमच्या टीव्ही9 च्या प्रतिनिधींनी संपर्क साधला. यावेळी त्यांनी मातोश्रीवरून आम्हाला साहेबांचा फोन आल्यामुळे परत जावं लागतंय, असं सांगितलं. त्यानंतर साहेब म्हणजे कोण हेही त्यांनी स्पष्ट केलं. आमचे साहेब म्हणजे, विनायक राऊत, संजय राऊत, अनिल देसाई… हे आहेत.. मला अनिलभाऊंचा फोन आला होता, असं त्यांनी सांगितलं. आता अनिल देसाई यांनी मातोश्रीवरून आमदारांना पुन्हा एकदा बोलावण्यामागील काय कारण आहे, याचे तर्क लावले जात आहे. एकिकडे एकनाथ शिंदेंची सेना वाढता वाढता वाढे… अशा गतीने अधिक बलवान होत चाललीय तर दुसरीकडे वर्षा सोडून मातोश्रीवर गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हातची सत्ताच काय तर पक्षही जाण्याची स्थिती उद्धवली आहे. त्यामुळे मातोश्रीवर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.