भुंकण्यासाठी भाजपाकडून यांची नियुक्ती, एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये, यांनी केली जहरी टीका
हे स्क्रिप्टेड असून दिल्लीतील नेत्यांनी त्यांना ही स्क्रिप्ट लिहून दिली होती.
सांगली : भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती केली आहे. काही अंतराने त्यातील एक जण भुंकतो. एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये भुंकतो. त्यांचा रिमोट दिल्लीत आहे. मुळात हे सर्व स्क्रिप्टेड असत, अशी टीका चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीस आणि उद्धव ठाकरे यांची आतेबहीण किर्तीताई पाठक यांनी केली. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे किर्तीताई पाठक बोलत होत्या. स्वाभिमान या शब्दाचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरपर्यंत संबंध नाही. गद्दार हा शब्द त्यांच्या कपाळावर कायमचाच बसलेला आहे, अशी टीकाही पाठक यांनी केली.
राज्यपाल यांनी तर कहरच केला आहे. महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसलेल्या राज्यपालांना राज्यातून हाकलून दिले पाहिजे. अस सांगून पाठक पुढे म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्र्यांनी एका मध्यस्थीचा देखावा केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत, सोलापूर आणि अक्कलकोटमधील गावांवर दावा केला आहे. हे स्क्रिप्टेड असून दिल्लीतील नेत्यांनी त्यांना ही स्क्रिप्ट लिहून दिली होती.
बोम्मई यांना मागणी करायला लावायचं आणि परत मध्यस्थी करण्याचा देखावा करायचा प्रयत्न भाजपच्या दिल्लीमधील नेत्यांनी केला आहे. कोणीच कोणाच्या गावांच्या वर दावा करायचा नाही. आता जे सांगितलं जात आहे ते म्हणजे जनतेला वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जनता वेडी बनणार नाही जनतेला सर्व काही माहीत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आता म्हणतात की ट्विटर हँडल माझं नाही. मात्र त्यापेक्षाही तुम्ही महाराष्ट्रातल्या बसेस आणि गाड्यांची तोडफोड केली. महाराष्ट्रातील मंत्र्यांना येऊ दिलं नाही. ही तुमची कृतीच सगळ्यांच्या समोर आलेली आहे. या कृतीचा आणि ट्विटर हँडलशी संबंध काय असा सवालही किर्तीताई पाठक यांनी केला.
विषय बदलायचे आणि जनतेला वेड्यात काढायचं हा धंदा थांबवा. जनता तुम्ही समजता एवढी दूध खुळी नाही, असा टोला ही पाठक यांनी लगावला.