मोहन देशमुख, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सत्त्ताधारी भाजपप्रणित एनडीएतील मित्र दुरावताना दिसत आहे, तर विरोधक एकत्र येत आहेत. आता आमदार हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडीही तसाच निर्णय घेण्याची चिन्हं आहे. बविआ आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.
या चर्चेत एक लोकसभा आणि तीन विधानसभा जागा देण्याची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बहुजन विकास आघाडीचं मुंबईजवळच्या उपनगरात मोठं प्राबल्य आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. बोईसरमधून विलास तारे, नालासोपारातून क्षितीज ठाकूर आणि वसईतून स्वत: हितेंद्र ठाकूर यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. शिवाय वसई-विरार ही महापालिका बहुजन विकास आघाडीकडे आहे. मनपा निवडणुकीत 115 पैकी तब्बल 106 जागा बहुजन विकास आघाडीने जिंकल्या.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतही बहुजन विकास आघाडीने मोठी मतं मिळवली होती. त्यामुळे बविआ आपल्यासोबत असावी अशी सर्वच पक्षांची अपेक्षा असते. त्यामुळे आता हा पक्ष काँग्रेससोबत जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
यामुळे काँग्रेसच्या महाआघाडीची ताकद वाढणार आहे. अशोक चव्हाण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचीही भेट घेणार आहेत.