Dr. Manmohan Singh : काँग्रेसचे अनेक दिग्गज होते शर्यतीत, या नेत्यांना पिछाडीवर टाकून भारताचे पंतप्रधान कसे बनले डॉ. मनमोहन सिंग ?
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2004 साली काँग्रेसतर्फे प्रणब मुखर्जी, अर्जुन सिंह, शिवराज पाटिल, एनडी तिवारी आणि पी.चिदंबरम यांची नावे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर होती खरी, पण सोनिया गांधी यांनी या 5 नेत्यांच्या तुलनेत डॉ. मनममोहन सिंग यांना प्राधान्य दिलं. यामागचं कारण काय होतं ?
तारीख 18 मे, साल 2004… अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला मात देऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीएचं सरकार स्थापन होणार होतं. सोनिया गांधी यांचं पंतप्रधान बनणं हे निश्चित मानलं जात होतं, मात्र 10 तेव्हाच जनपथवर पोहोचलेल्या रामविलास पासवान यांना समजलं की सोनिया गांधी या पीएम बनणार नाही. या बातमीची पुष्टी करण्यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांना लागलीच फोन लावला, पण तिथून त्यांना काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
‘संघर्ष, साहस और संकल्प’ या त्यांच्या चरित्रात रामविलास पासवान यांनी त्या दिवसाचा उल्लेख केला आहे.( पुस्तकात) ते म्हणतात – ज्या क्षणी मी 10 जनपथमधून बाहेर पडलो, तेव्हाच मीडियामध्ये ही बातमी फ्लॅश होत होती. आत पंतप्रधान होणार तरी कोण ? याची आम्हाला सर्वांनाच उत्सुकता होती, पण लवकरच काँग्रेसकडून याबद्दल माहिती देण्यात आली. मात्र जे नाव समोर आलं ते फारच धक्कादायक होतं – ते नाव म्हणजे डॉ. मनमोहन सिंग यांचं.
2004 मध्ये सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्यास नकार दिल्यानंतर मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपद देण्यात आले. सिंग हे त्यावेळी राज्यसभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते. तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी तर मनमोहन सिंग हेच पंतप्रधान होतील असा दावा केला होता, त्याची अधिकृत माहिती अखेरच्या क्षणी राष्ट्रपती कार्यालयाला देण्यात आली.
सोनिया गांधी यांच्या नकारानंतर 5 नेते होते दावेदार
सोनिया गांधींनी पंतप्रधान बनण्यास का नकार दिला, याबाबत वेगवेगळे दावे केले जातात. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात 5 नेत्यांची पीएम इन वेटिंग म्हणून वर्णी लागली. जे नेते पंतप्रधान होऊ शतील अशी चर्चा होती त्यामध्ये प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंह, एनडी तिवारी, शिवराज पाटील आणि पी चिदंबरम यांची नावं होती.
प्रणव मुखर्जी – ते काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते होते. इंदिरा गांधी यांच्या काळापासून ते मंत्री होते. त्यांनी या (पंतप्रधानपदाच्या) खुर्चीवर बसावे असे पक्षातील बहुतांश नेत्यांना वाटत होते, पण प्रणव मुखर्जी हे पंतप्रधान होऊ शकले नाहीत. पंतप्रधान न होऊ शकल्याबद्दल प्रणव यांनी अनेकदा खंत व्यक्त केली. प्रणव मुखर्जी हे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये अर्थ आणि संरक्षण मंत्री होते.
अर्जुन सिंह – ते गांधी घराण्याच्या जवळचे मानले जात होते. राजीव आणि सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले अर्जुन सिंह हे मित्रपक्षांचेही आवडते नेते होते. पुढे मनमोहन सरकारमध्ये अर्जुन सिंग यांना शिक्षणमंत्री करण्यात आले.
एनडी तिवारी – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले एनडी तिवारी हेही पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार होते. तिवारी हेही गांधी कुटुंबाचे जवळचे मानले जात होते. मात्र, तिवारी यांना पंतप्रधानपद मिळू शकले नाही.
शिवराज पाटील – महाराष्ट्राचे शक्तिशाली नेते असलेले शिवराज पाटील हेही पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार होते. मुंबई हे अर्थव्यवस्थेचे केंद्र मानले जाते. पाटील यांची मुंबईत मजबूत पकड होती, मात्र त्यांनाही पंतप्रधानपद मिळू शकले नाही. नंतर पाटील यांना मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री करण्यात आले.
पी चिदंबरम – अर्थतज्ज्ञ पी चिदंबरम हेही पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार होते. दक्षिणेतील राज्यांना जवळ करण्यासाठी काँग्रेस चिदंबरम यांना पंतप्रधान करू शकते, असे त्यावेळी बोलले जात होते. चिदंबरम हे अनेक सरकारमध्ये मंत्री होते. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये चिदंबरम यांना गृह आणि अर्थमंत्री करण्यात आले.
मनमोहन सिंग कसे बनले पंतप्रधान ?
मात्र मनमोहन सिंग हे पंतप्रधान होण्यासाठी 3 घटक महत्वाचे ठरले. पहिला मुद्दा म्हणजे मनमोहन सिंग हे कोणत्याही गटाचे नव्हते. त्यावेळी काँग्रेसमध्ये दक्षिण आणि उत्तरसह अनेक गट सक्रिय होते. नरसिंह राव यांच्या सरकारमधील या गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव झाला. सोनियांना पुन्हा धोका पत्करायचा नव्हता.
मनमोहन सिंग यांचे राजकीय व्यक्ती नसणे हेही त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले. राहुल गांधी यांनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसचे लोक त्यांच्यासाठी एक मोठं पीच तयार करत होते. अशा स्थितीत मनमोहन यांच्याशिवाय अन्य कोणत्याही राजकीय व्यक्तीला पंतप्रधानपद दिले असते, तर राहुल यांच्या भविष्याच्या दृष्टीने ते आव्हानात्मक ठरले असते.
तिसरा मुद्दा म्हणजे मनमोहन सिंग यांचं कामकाज. अर्थमंत्री असताना मनमोहन सिंग यांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढले होते. 2004 मध्येही काँग्रेसने आर्थिक धोरण आणि रोजगाराशी संबंधित अनेक आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्यासाठी दूरदर्शी नेत्याची गरज होती. याच मुद्यांमुळे मनमोहन सिंग हे अव्वल ठरले आणि त्यांनी 2004 साली पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.