मुंबई: गेल्या महिनाभरापासून दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलचं तापलं होतं. अवघ्या राज्याचं लक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाच्या मेळाव्याकडे लागलं होतं. अखेर बुधवारी बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा तर शिवाजी पार्कमध्ये शिवसेना (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला. दोन्ही गटांकडून एकोंमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. हे दोन्ही मेळावे आणखी एका कारणासाठी चर्चेत होते, ते म्हणजे दोन्ही गटाकडून दावा करण्यात येत होता की आमच्याच दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होईल. अखेर कोणाच्या दसरा मेळाव्याला किती लोकांनी हजेरी लावली याचा अंदाज मुंबई पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहाता पोलिसांनी दोन्ही दसरा मेळाव्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होती याबाबतचा एक अंदाज मुंबई पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला एक लाख तर शिंदे गटाच्या मेळाव्याला अंदाजे दोन लाख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दरम्यान शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात असे काही लोकं होते ज्यांना ते इथे कशासाठी आले आहेत हेच त्यांना माहित नव्हतं. कोणी म्हणायचं आम्ही राम शिंदे यांच्या सभेला आलो आहोत, तर कोणी म्हणायचं आम्ही उद्धव ठाकरेंच्या सभेला आलो आहोत, असा टोला शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी लगावला आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेला उपस्थित असलेल्या कोणत्याही शिवसैनिकाला विचारा की तुम्ही इथे कशासाठी आला आहात तर त्यांचे एकच उत्तर असेल ते म्हणजे आम्ही उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला आलो आहोत.