अभिषेक घोसाळकर यांना किती गोळ्या लागल्या?; कोण आहेत घोसाळकर?
ठाकरे गटाचे नेते, माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या कार्यालयात दोन जणांनी घुसखोरी केली. त्यातील एकाने गोळ्या घातल्याचं सूत्रांनी सांगितलं. गोळ्या लागल्याने घोसाळकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ करुणा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.
कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : कल्याणमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर यांना तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या मारण्यात आल्याचं कळल्यानंतर शिवसैनिकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली असून रुग्णालयात बाहेर मोठी गर्दी झाली आहे.
अभिषेक घोसाळकर हे त्यांच्या कार्यालयात बसलेले असताना दोन व्यक्तींनी येऊन गोळ्या घातल्या. त्यातील मॉरीस नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या घातल्याचं ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी सांगितलं. अभिषेक घोसाळकर यांना चार गोळ्या लागल्या आहेत, असंही सूत्रांनी सांगितलं. अभिषेक यांना बोरीवलीच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस कामाला लागले
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींच्या जबानी घ्यायला सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही चेक करण्यात येणार आहेत. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं लक्ष आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
कोण आहेत अभिषेक घोसाळकर?
अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकर हे दोनदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दहिसरमधील तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची प्रतिमा आहे. घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर 7 चे नगरसेवक होते. सध्या हा वॉर्ड शितल म्हात्रे यांच्याकडे आहे. सध्या घोसाळकर यांची पत्नी वॉर्ड नंबर 1 ची नगरसेविका होती.