मी पद न मिळाल्याने पक्ष सोडणारा कार्यकर्ता नाही : अनिल बाबर
"पद मिळाले नाही म्हणून मी पक्ष सोडणारा कार्यकर्ता नाही", असं वक्तव्य शिवसेनेचे विटा खानपूरचे आमदार अनिल बाबर (Shivsena mla Anil Babar) यांनी केलं आहे.
सांगली : “पद मिळाले नाही म्हणून मी पक्ष सोडणारा कार्यकर्ता नाही”, असं वक्तव्य शिवसेनेचे विटा खानपूरचे आमदार अनिल बाबर (Shivsena mla Anil Babar) यांनी केलं आहे. अनिल बाबर यांनी आज (4 जानेवारी) कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केलं. सांगलीतील विटा खानापूर येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना (Shivsena mla Anil Babar) कार्यकर्ते उपस्थित होते.
“पद मिळाले नाही म्हणून मी एखादा पक्ष सोडणारा कार्यकर्ता नाही. मी मंत्रिपदासाठी इछुक होतो. पण सत्तेसाठी नाराज होऊन एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणारा कार्यकर्ता नाही. नाराजी ही विकासाच्या दृष्टीने असते. मी नाराज नाही. मंत्रिपद न मिळाल्याने मी पक्ष सोडणार अशीही चर्चा सुरु होती”, असं अनिल बाबर यांनी सांगितले.
“नाराजी आणि माझा संघर्ष राजकारणात कायम असेल. पण संघर्ष आणि नाराजी ही विकास कामासाठी असेल. माझ्या मतदारसंघात एखादे काम मला अपेक्षित आहे ते झालं नाही तर मी निश्चितपणे नाराज होईल. तसेच संघर्ष करेन पण तोही विकासकामांसाठी असेल. कार्यकर्त्यांमधील नाराजी जाण्यास सहा महिने लागतात. त्यामुळे याचा परिणाम विकासकामांवर होतो. हा विचार करुन मी कार्यकर्ता मेळावा बोलवला. मी कार्यकर्त्यांना सांगितले की नाराजी सोडून द्या. वक्त से पहले किस्मत से ज्यादा कुछ ना कुछ मिलता है”, अशी शायरीही अनिल बाबर यांनी म्हटली.
“गेल्या काहीदिवसांपासून अनिल बाबर हे नाराज आहेत, अशी माहित समोर येत होती. मात्र मी नाराज नाही”, असं स्पष्टीकरण खुद्द अनिल बाबर यांनी दिलं.
“सोशल मीडियातून काही चुकीचे मेसेज जाण्याची शक्यता असते. विकासकामाच्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य राहावे म्हणून हा मेळावा बोलवला होता. या मेळाव्यामध्ये कुठल्या नाराजीचा प्रश्न नाही”, असं बाबर यांनी सांगितले.
“भविष्यात येणाऱ्या अधिवेशनात मी शिवसेनेचा आहे की इतर कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार न करता जनतेची भूमिका ठामपणे मांडणार आहे. मग शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा असो किंवा जे नियमित कर्जफेड करतात त्यांच्या मदत करण्याचा विषय असो हे सर्व मुद्दे मी मांडणार आहे”, असंही बाबर यांनी सांगितले.