मैं अविवाहित हूं, कुंवारा नहीं, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी असे उत्तर दिले होते तेव्हा…
अटलबिहारी वाजपेयी यांना लग्नाबाबत सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आले. या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर खूपच लोकप्रिय ठरले. लग्नासंबंधीच्या एका प्रश्नावर ते म्हणाले होते, "मी अविवाहित आहे... पण बॅचलर नाही."

नवी दिल्ली | 25 डिसेंबर 2023 : देशाचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. यानिमित त्यांचे काही गाजलेले किस्से अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर लिहिलेल्या ‘हार नही मानुंगा: एक अटल जीवन गाथा’ या पुस्तकातून घेतले आहेत. हे किस्से मनोरंजक आहेतच. शिवाय अटलबिहारी वाजपेयी किती हजरजबाबी होते हे यामधून दिसून येते. अटलबिहारी वाजपेयी यांनी एका प्रश्नाला मैं अविवाहित हूं, कुंवारा नहीं असे जेव्हा उत्तर दिले तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
एकदा एका पार्टीमध्ये एका महिला पत्रकाराने अटलजी यांना “वाजपेयीजी, तुम्ही अजूनही अविवाहित का आहात?” असे विचारले. त्यावर त्यांनी “आदर्श पत्नीच्या शोधात” असे उत्तर दिले. त्यावर त्या महिला पत्रकाराने “ती सापडली नाही का?” असा प्रतिप्रश्न केला. त्यावर वाजपेयी यांनी “ती सापडली होती पण ती एक आदर्श नवरा देखील शोधत होती.” असे उत्तर देत त्या महिला पत्रकाराला निरुत्तर केले.
अटलबिहारी वाजपेयी यांचे लग्न झाले नव्हते. पण, श्रीमती कौल त्यांच्यासोबत पंतप्रधानांच्या निवासस्थानात राहत होत्या. मात्र त्या त्यांच्या पत्नी नव्हत्या. अटलबिहारी वाजपेयी आणि कौल यांच्या या प्रेमकथेला कधीच नाव मिळू शकले नाही,
1978 मध्ये वाजपेयी हे परराष्ट्र मंत्री होते. चीन आणि पाकिस्तानच्या दौरा करून ते भारतात परत आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने त्यांना “वाजपेयीजी, पाकिस्तान, काश्मीर आणि चीनची चर्चा बाजूला ठेवा आणि मला सांगा, श्रीमती कौलचे काय प्रकरण आहे?” असा थेट प्रश्न केला. हा प्रश्न ऐकून सगळे शांत झाले. सगळ्यांच्या नजरा अटलबिहारी वाजपेयींवर खिळल्या. पत्रकाराने विचारलेल्या त्या प्रश्नावर अटलबिहारी काही वेळ गप्प राहिले. मात्र, क्षणात त्यांनी हसतमुखाने उत्तर दिले, ‘हा काश्मीरसारखा मुद्दा आहे.’ त्यांच्या या उत्तराला सर्वांनी हास्यरुपी दाद दिली.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जनसंघावर खूप मोठी टीका केली होती. त्यावर अटलजी म्हणाले, “मला माहित आहे की पंडितजी रोज शीर्षासन करतात. ते शीर्षासन करतात याबद्दल मला आक्षेप नाही. पण, माझ्या पक्षाचे चित्र त्यांनी उलटे पाहू नये इतकीच विनंती. त्याच्या या उत्तरावर पंडित नेहरू यांनीही खळखळून दादा दिली होती.
80 च्या दशकामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी उत्तर प्रदेशातील दलितांवरील अत्याचाराच्या घटनेसंदर्भात पदयात्रा काढली. इंदिरा गांधी त्यावेळी देशाच्या पंतप्रधान होत्या. वाजपेयी यांचे आप्पा घटाटे हे घनिष्ट मित्र होते. त्यांनी वाजपेयी यांना विचारले, पदयात्रा किती दिवस चालणार? त्यावर अटल यांनी बेमिसाल उत्तर दिले, “मला पद मिळेपर्यंत हा प्रवास सुरूच राहील.” असे ते म्हणाले.
वाजपेयी यांच्या नावातच बिहारी होते याचाच आणखी एक किस्सा. 2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी एका निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी बिहारमध्ये गेले होते. त्यावेळी व्यासपीठावरून जनतेला संबोधित करताना ते म्हणाले, ‘मी खंबीर आहे आणि बिहारीही आहे.’ त्याचे हे वाक्य ऐकून लोकांनी टाळ्यांचा कडकडात केला होता.