मुंडे साहेब म्हणाले होते, माझ्या मुलींची काळजी घ्या, आम्ही दोन्ही राजे मुंडे भगिनींच्या पाठिशी
बीड : छत्रपती संभाजीराजे हे बीडच्या भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी परळीत दाखल झाले. बीडमध्ये जातीचं राजकारण सुरु आहे. ते थांबवण्यासाठीच मी इथे आलोय, असं ते म्हणाले. भाजपकडून प्रितम मुंडे या वंजारी समाजाच्या, तर राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे हे मराठा उमेदवार आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जातीयवादी प्रचार सुरु आहे. हे […]
बीड : छत्रपती संभाजीराजे हे बीडच्या भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी परळीत दाखल झाले. बीडमध्ये जातीचं राजकारण सुरु आहे. ते थांबवण्यासाठीच मी इथे आलोय, असं ते म्हणाले. भाजपकडून प्रितम मुंडे या वंजारी समाजाच्या, तर राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे हे मराठा उमेदवार आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जातीयवादी प्रचार सुरु आहे. हे थांबवण्यासाठी खुद्द संभाजीराजे यांनीच पुढाकार घेतलाय. शिवाय आम्ही दोन्ही राजे मुंडे भगिनींच्या पाठिशी उभे आहोत, असंही ते म्हणाले.
संभाजीराजेंनी प्रितम मुंडे यांची परळीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि पाठिंबा दिला. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि माझे कौटुंबीक संबंध आहेत. प्रितम मुंडेंना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलोय. मराठा असणं हा अभिमान आहे. मात्र बहुजनांनाही एकत्रित केलं पाहिजे. माझं पुढील जीवन बहुजन समाजाला एकत्रित आणण्यासाठीच असेल. जातीपातीचं राजकारण होऊ नये यासाठीच मी इथे आलोय, असं संभाजीराजे म्हणाले.
“जातीचं राजकारण करु नका, एकत्र या”
शिवरायांनी अठरापगड जाती धर्माच्या, बारा बलुतेदार लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शाहु, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना एकत्रित करून न्याय मिळवून दिला. तोच आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. राजकारणात मला जातपात मान्य नसून लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात हे घडतं हे दुर्दैवं आहे. गोपीनाथराव मुंडे घराण्याचे आणि आमचे कौटुंबीक संबंध आहेत. मुंडे साहेबांनी बहुजनांसाठी आयुष्य वेचलं. रायगडावर असो किंवा दिल्लीत शिवरायांच्या जयंतीला मुंडे साहेब सहकार्य करायचे. पंकजाताई मुंडे आणि प्रितमताई मुंडे या माझ्या भगिनी असून लोकसभा निवडणुकीत प्रितमताईंना शुभेच्छा देण्यासाठी मी खास परळीत आलोय, असं संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले, साहेबांच्या निधनाअगोदर माझी त्यांच्याशी भेट झाली होती. रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला ते येणारही होते. मात्र सहज बोलताना त्यांनी माझ्या मुलींकडे लक्ष ठेवा सांगितल्याची आठवण त्यांना झाली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्यांच्या पाठिमागे भावाप्रमाणे खंबीरपणे उभा आहे आणि त्यामुळेच शुभेच्छा देण्यासाठी परळीत आलो.
संभाजीराजे या निवडणुकीत प्रचारात सक्रिय नाहीत. यावरही त्यांनी उत्तर दिलं. “मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. पण भाजपाचा सहयोगी सदस्य आहे. माझे समर्थन भाजपाला आहे. देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता महत्वाची आहे. मोदी पंतप्रधान झाले तर आनंदच आहे आणि ते व्हावेत. जातीपातीचे राजकारण करण्यापेक्षा विकासाचा विचार हा खर्या अर्थाने बहुजन समाजाच्या कल्याणासाठी महत्वाचा आहे.”
दोन्ही राजे मुंडे भगिनींच्या पाठिशी
“गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही दोन्ही छत्रपती एकत्र आलो होतो. खा. छत्रपती उदयनराजेंचे मुंडे भगिनींवर प्रेम आहे म्हणून त्यांची भूमिका ही स्पष्ट आहे,” असं म्हणत संभाजीराजे यांनी मुंडे भगिनींच्या पाठिशी राहण्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी राजेंनी प्रितम मुंडेंना पुष्पगुच्छ देऊन निवडणूक विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
VIDEO : संभाजीराजेंशी बातचीत