ना मला पक्षाचा निरोप, ना बैठकांचं निमंत्रण, विधानपरिषदेची संधीही नाही, मेधा कुलकर्णींची अप्रत्यक्ष नाराजी
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडून मेधा कुलकर्णी यांचे राजकीय पुनर्वसन होणे अपेक्षित होते. | Medha Kulkarni
पुणे: भाजपकडून मला हल्ली बैठका आणि आंदोलनासाठी निरोप दिले जात नसल्याचे सांगत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका निवडणुकांच्या बैठका होतात, त्याचाही निरोप दिला जात नाही, आजच्या आंदोलनाचाही मला निरोप देण्यात आला नव्हता. त्यामुळे माझे पक्षाला काही प्रश्न आहेत, ते मी पक्ष पातळीवरच विचारेन, असे वक्तव्य मेधा कुलकर्णी यांनी केले. (BJP former MLA Medha Kulkarni not happy with parties approach)
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आले होते. यानंतर भाजपकडून त्यांचे विधानपरिषदेत पुनर्वसन होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरही त्यांच्या नावाचा विचार केलेला नाही. त्यामुळे मेधा कुलकर्णी भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. अगदी त्या मनसेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही कानावर येत होत्या. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मेधा कुलकर्णी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली.
यावेळी मेधा कुलकर्णी यांनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखविली. पक्षाने मला विधान परिषदेचा शब्द दिला होता. आता झालेल्या विधान परिषदेच्या निवडणूकांमध्ये मला संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. परंतु, तसे घडले नाही. या सर्व गोष्टी मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कानावर घातल्या आहेत. माझ्या मनात असलेले प्रश्न मी पक्षालाचा विचारेन. मात्र, आगामी काळात पक्ष माझ्यावर जबाबदारी देईल, अशी आशा मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. तसेच मी दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नसल्याचेही मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
मेधा कुलकर्णींना पदवीधर मतदारसंघाचे तिकीट तरी देणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात…
मेधा कुलकर्णी यांना विधानपरिषदेलाही डावलण्यात आले. आता शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तरी मेधा कुलकर्णी यांना संधी मिळणार का, असा प्रश्न चंद्रकांतदादांना विचारला असता, ते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत गेले. पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देणार का, हे आता अनिश्चित आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
मेधा कुलकर्णी म्हणतात, मनसे प्रवेशाची चर्चा केवळ वावडी, मात्र मनसे नेत्यांकडून स्पष्ट संकेत
मेधा कुलकर्णींना पदवीधर मतदारसंघाचे तिकीट तरी देणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात…
कोल्हापुरातून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णींना का डावललं? भुजबळांचा चंद्रकांतदादांना चिमटा
(BJP former MLA Medha Kulkarni not happy with parties approach)