हर्षवर्धन पाटलांनंतर आता भाजपचा आणखी एक नेता म्हणतो, माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार
मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील राजकीय विरोधकांविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातो, असा आरोप सातत्याने होतो. केंद्रीय यंत्रणा निवडकपणे कारवाई करतात. चौकशी सुरु असलेला एखादा नेता भाजपमध्ये आला की त्याला अभय मिळते, असे सर्रास म्हटले जाते. | MP Sanjay Patil
सांगली: भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विधानामुळे झालेला वाद ताजा असतानाच आता भाजपच्या आणखी एका नेत्याने स्फोटक वक्तव्य केले आहे. माझ्यामागे कधीही सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) ससेमिरा लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे, असे वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केले.
ते शनिवारी विटा येथील कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत का काय, असे संजयकाका पाटील यांनी म्हटले. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून केलेल्या भाष्याच्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केले.
मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील राजकीय विरोधकांविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातो, असा आरोप सातत्याने होतो. केंद्रीय यंत्रणा निवडकपणे कारवाई करतात. चौकशी सुरु असलेला एखादा नेता भाजपमध्ये आला की त्याला अभय मिळते, असे सर्रास म्हटले जाते. मात्र, आता संजकाका पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यांमुळे विरोधकांच्या दाव्याला एकप्रकारे पुष्टी मिळताना दिसत आहे.
हर्षवर्धन पाटील काय म्हणाले होते?
हर्षवर्धन पाटील हे आपलं खुमासदार भाषण आणि मिश्किल वक्तव्यांमुळं चांगलेच चर्चेत असतात. मावळमध्ये बोलताना काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, याचं उत्तर त्यांनी दिलं. ‘स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात? तेव्हा मी त्याला म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? बाकी सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे, चांगली झोप लागते, चौकशी वगैरे नाही’, असं वक्तव्य पाटील यांनी केलं. पाटलांच्या या वक्तव्यानं स्टेजवर उपस्थित सर्वांच खळखळून हसले.
‘शाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील’
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जसह पकडण्यात आलं आहे. त्यावरून भाजप सातत्याने प्रतिक्रिया देत आहे. उद्या जर शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील, अशी जोरदार टोलेबाजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
छगन भुजबळ पहिल्यांदाच बीडमध्ये आले होते. सध्या कोणावरही धाडी सुरू आहेत. शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर इथे कोकेन नाही तर पीठ सापडले असे म्हणतील, अशी टीका भुजबळांनी भाजपवर केली. तसेच सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
आर.आर. पाटलांचा कडवा विरोधक, वसंतदादांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवणारा नेता; कोण आहेत संजयकाका पाटील?