माझ्याविरोधातले आरोप सिद्ध करावे, राजकारण सोडून देईल : खडसे
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाविरोधातील नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली. ज्या व्यक्तीने आयुष्यभर भ्रष्टाचाराविरोधात लढा दिला, त्याच व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि ते खरे की खोटे याची शहानिशा न करताच पक्षाने बाजूला केल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. शिवाय पक्षाला काही सवालही केले. गेल्या 40 वर्षात मी एकही निवडणूक हरलो नाही. या […]
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाविरोधातील नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली. ज्या व्यक्तीने आयुष्यभर भ्रष्टाचाराविरोधात लढा दिला, त्याच व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि ते खरे की खोटे याची शहानिशा न करताच पक्षाने बाजूला केल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. शिवाय पक्षाला काही सवालही केले.
गेल्या 40 वर्षात मी एकही निवडणूक हरलो नाही. या काळात संघर्ष करत पारदर्शी कारभार केला. तरीही मला भ्रष्टाचारी ठरविले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि मी राजकारणातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा दिला. तरीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे, हे कोणी पहात नाही. पक्ष आणि सरकारला माझा प्रश्न आहे की, मी काय गुन्हा केला हे सांगा. मी गुन्हा केला असेल, तर राजकारणातून निवृत्त होईन, असे सांगत तुमचा मंत्री आणि तुमच्या मनातील नाथाभाऊ मीच आहे, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
पुण्यातील नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे संस्थेच्या सभागृहात चौथ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आलं होतं. युवा संसदेत आदर्श मंत्री पुरस्कार राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते. या कार्यक्रमासाठी शिवसंग्रामचे विनायक मेटे, शिवसेनेच्या निलम गोऱ्हे, संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव जाधवर, शार्दुल जाधवर यांची उपस्थिती होती.
राजकारण आणि आश्वासन या विषयावर पाचव्या सत्रात पाहुण्यांनी संसदेत सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुन्हेगारी विरोधात लढा देऊनही माझे दाऊदच्या बायकोशी संभाषण झाल्याचे संबंध जोडले गेले. ते खरे की खोटे हे कोणी पाहात नाही. त्यामुळे ही खंत मी वारंवार बोलून दाखवणार आहे. गोपीनाथ मुंडे आणि मी राजकारणातील गुन्हेगारीविरोधात लढा उभारला होता. मात्र आता इतरांसारखे केव्हा झालो हे लक्षात आले नाही, अशी खंतही त्यांनी उपस्थित केली.