…. म्हणून मी मोदींच्या शपथविधीला जाणं टाळलं : पंकजा मुंडे
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पण भाजपच्या राज्यातील स्टार प्रचारक ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची शपथविधीला अनुपस्थिती होती. शपथविधीला न जाण्यामागचं कारणही त्यांनी सांगितलंय. मागच्या विजयानंतर केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेणारे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण येत होती. त्यामुळेच आपण शपथविधीला गेलो नाही, असं त्या म्हणाल्या. 2014 ला भाजपने […]
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पण भाजपच्या राज्यातील स्टार प्रचारक ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची शपथविधीला अनुपस्थिती होती. शपथविधीला न जाण्यामागचं कारणही त्यांनी सांगितलंय. मागच्या विजयानंतर केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेणारे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण येत होती. त्यामुळेच आपण शपथविधीला गेलो नाही, असं त्या म्हणाल्या.
2014 ला भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. महाराष्ट्रातील विविध पक्षांना एकत्र आणत महायुती तयार करणे आणि सर्वात जास्त जागा जिंकण्यात गोपीनाथ मुंडे यांचाही सर्वात मोठा वाटा होता. विजयानंतर त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्रीपद देण्यात आलं. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर गोपीनाथ मुंडे बीडला येणार होते. रस्ते त्यांच्या स्वागतासाठी सजले होते, लोकांमध्येही प्रचंड उत्सुकता होती. पण नियतीला वेगळंच मान्य होतं. 3 जून 2014 रोजी दिल्लीहून येताना गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शोककळा पसरली होती.
अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मस्थळी पंकजा मुंडे यांनी अभिवादन केलं. यावेळी त्यांनी अहिल्यादेवी यांच्या कर्तृत्ववाच्या गोष्टी सांगितल्या. चांगलं काम केलं तर लोक टाळ्या, शिट्ट्या वाजवतात, असं म्हणत आमचे अनेक हिरे आहेत, गोपीचंद पडळकर हा एक हिरा वंचितला सापडलाय, अशा शब्दात त्यांनी कौतुकही केलं.
मी संघर्ष यात्रा काढली तेव्हा जिजामातांपासून सुरवात केली आणि अहिल्यादेवींच्या गावी समाप्त केली. अहिल्यादेवींनी बांधलेल्या विहिरी, पूल अजूनही तसेच आहेत. तसाच विकास आम्हाला करायचाय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
यावेळी पंकजा मुंडेंनी जातीवादावर देखील टीका केली. वंचितांसाठी काम करायचं हे मुंडे साहेबांनी सांगितलं होतं. त्या दिशेने मी काम करत आहे. तसेच धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी विधानसभेची पायरी चढणार नाही असे मी म्हणाले होते. आता ते मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ड चं र करण्यासाठी 70 वर्षे लागली. आता धनगरांना आरक्षण मिळण्यासाठी मी तर आहेच, पण छत्रपती संभाजी देखील आहेत. आता काळे झेंडे नाही, तर पिवळे झेंडे हाती घ्यायचे. आम्ही जेवढे मायाळू तेवढेच ताकदवानही आहोत, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. आरक्षणासाठी आता भांडायची गरज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.