मी मुख्यमंत्री होईन, असं वचन शिवसेनाप्रमुखांना कधीच दिलं नव्हतं : उद्धव ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले (Uddhav thackeray speech) होते.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले (Uddhav thackeray speech) होते. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 11 ज्येष्ठ शिवसैनिकांनी सत्कार केला. या सत्कार सभारंभानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण करत भाजपवर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर सडकून टीका केली.
“मी हे माझे मुख्यमंत्री पद हा माझा मान आजपर्यंत जे जे शिवसेनेचे नेते किंवा ज्या ज्या शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या, घाम गाळला, रक्त सांडलं. त्यांच्या चरणी समर्पित करतो आहे. या पुढची लढाईला तुमची साथ सोबत पाहिजे आहे. हे माझं सुरक्षा कवचं आहे. शिवसेनाप्रमुखांसोबतही तेच सुरक्षाकवच होतं. हे जो पर्यंत आमच्या सोबत आहे. तोपर्यंत मला कोणाचीही पर्वा नाही.”
“मी जी जबाबदारी स्विकारली ती माझ्या स्वप्नात कधीही नव्हती. मी शिवसेनाप्रमुखांना मी मुख्यमंत्री होईन असं वचन दिलेले नाही. अजिबात नाही. पण ही जबाबदारी स्विकारली.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली, “मधल्या काळात जी टीका झाली की शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला. 2014 ला तुम्ही आमच्याशी युती तोडली होती. हिंदुत्वावादी शिवसेनेसोबतची युती तेव्हाही तुम्ही तोडली होती. तेव्हा अदृष्य हाताच्या मदतीने सरकार स्थापन केलं होतं आणि आता दिलेला शब्द मोडल्यानंतर आमचा चेहरा उघड झाला असेल. पण तुमचं काय तुम्ही अख्खेच्या अख्खे उघडे झालेले आहात. हे पूर्ण दुनियेने बघितलं आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“तुमच्यासमोर त्यांनी मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला काय तोंड दाखवलं असतं. तुमच्या मनात माझ्याबद्दल काय भावना असती, की शिवसेनाप्रमुखांचा पुत्र खोटं बोलतोय. हे कदापी होणं नाही. प्राण गेला तरी बेहत्तर पण मी तुमच्याशी आणि माझ्या जनतेशी खोटं बोलणार नाही. म्हणून मी हा वेगळा मार्ग स्विकारला,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“कारण जे 25 किंवा 30 वर्षे आपले विरोधक होते. त्यांचा हातात हात घेऊन मी सरकार स्थापन केलं. उघडपणे केलं. चोरुन मारुन केलेले नाही. याचा अर्थ मी भगवा खाली ठेवला असा नाही. ना आमचा रंग आम्ही बदलला ना आमचा अंतरंग आम्ही बदलला. आमचा अंतरंगही भगवाच आहे आणि आमचा रंगही भगवाच आहे.” अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे नाव न घेता उद्धव ठाकरेंनी केली.