मला तुम्ही कोथरुडमध्येच अडकवून ठेवलंय : चंद्रकांत पाटील
तुम्ही सर्वांनी मला राज्यात बिनधास्त फिरा असा विश्वास दिला असता तर मी तुम्हाला महायुतीची अपडेट माहिती दिली," असं मिश्कील वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं. ते पुण्यात बोलत होते.
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना कोथरूडला (Kothrud Chandrakant Patil) अडकवून ठेवण्याची विरोधकांची खेळी यशस्वी ठरल्याचं चित्र आहे. “माझा एक पाय कोथरूडमध्ये आणि एक पाय मुंबईत आहे. तुम्ही मला कोथरूडमध्ये (Kothrud Chandrakant Patil) अडकून ठेवलंय. तुम्ही सर्वांनी मला राज्यात बिनधास्त फिरा असा विश्वास दिला असता तर मी तुम्हाला महायुतीची अपडेट माहिती दिली,” असं मिश्कील वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं. ते पुण्यात बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा सध्या व्यवहारात येण्याची ही वेळ नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. त्यांच्या या विधानाने शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर मात्र त्यांनी पाणी फेरलं. प्रत्येकाला लोकशाहीत इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. इच्छा व्यवहारात आल्यानंतरच निर्णय होतो. मात्र सध्या शिवसेनेची इच्छा व्यवहारात येण्याची वेळ नाही, असं त्यांनी म्हटलंय. निकालनंतर हे स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.
युतीच्या बंडावर बोलताना, “सर्वांना न्याय देण्यात मर्यादा येतात. मला न्याय मिळाला, मात्र मेधा कुलकर्णींवर अन्याय झाला. राज्यात भाजपला काही ठिकाणी जागा मिळाल्या नाही, तर काही ठिकाणी शिवसेनेला मिळाल्या नाही. मात्र राज्याचा आम्हाला विकास करायचा आहे. त्यामुळे अन्य गोष्टीत अडकून पडू नये,” असं आवाहन त्यांनी केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मैदान दिलं जात नसल्याचा आरोप केला जातोय. यावरही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. आचारसंहितेत सरकारची कोणतीही भूमिका नसते, असं ते म्हणाले.
युतीतील मित्रपक्षांना भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजपाने दीर्घकाळ कोणावर अन्याय केलेला नाही. कदाचित प्रसंगानुसार कधी झाला असेल. रामदास आठवले यांच्या बरोबर सदिच्छा भेट झाली, मात्र तशी काही नाराजी नाही,” असं ते म्हणाले.