बीडची जागा मलाच, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय : विनायक मेटे
युतीमध्ये बीडची जागा शिवसेनेकडे असून जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेचे संभावित उमेदवार आहेत. पण विनायक मेटेंकडूनही वारंवार या जागेवर दावा केला जात आहे.
मुंबई : बीड विधानसभेची जागा आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete Beed) यांनी केला. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शब्द दिला आहे, असा दावाही त्यांनी (Vinayak Mete Beed) केला. युतीमध्ये बीडची जागा शिवसेनेकडे असून जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेचे संभावित उमेदवार आहेत. पण विनायक मेटेंकडूनही वारंवार या जागेवर दावा केला जात आहे.
“निवडणूक महायुतीतच लढणार”
शिवसंग्राम पक्ष महायुतीचा घटक पक्ष म्हणून कायम राहणार आहे. भाजपकडे आम्ही एकूण 12 जागा मागितल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला कमीत-कमी सहा ते सात जागा मिळाल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. त्यानुसार आज आम्ही विचारविनिमय केला आणि आम्ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार आहोत, असं विनायक मेटेंनी सांगितलं.
“बीडच्या जागेबाबत भाजपकडून शब्द”
बीडची जागा कोणी प्रतिष्ठेची केली हे मला काय माहिती नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि मुख्यमंत्र्यांचं उमेदवारीच्या जागा संदर्भात चालतं. बाकी कोणाचं काही त्याबाबत चालत नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी मला बीडची जागा देण्याचा शब्द दिला आहे, असा दावा विनायक मेटे यांनी केला.
बीडची जागा शिवसेनेकडे
विनायक मेटे वारंवार भाजपसोबत राहणार सांगत असले तरी बीडमध्येच त्यांचं स्थानिक नेत्यांशी जमत नाही. त्यातच जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेकडून संभावित उमेदवार आहेत आणि ही निवडणूक युतीमध्येच लढवणार असल्याचं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे विनायक मेटेंनी केलेल्या दाव्याचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे.
विनायक मेटे यांनी 2014 ला शिवसंग्रामकडून बीड विधानसभेची जागा लढवली होती. त्यावेळी युती नसल्यामुळे शिवसेनेचाही उमेदवार मैदानात होता. तर भाजपने ही जागा विनायक मेटे यांच्या रुपाने शिवसंग्रामला दिली. पण या जागेवर राष्ट्रवादीत असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळवला होता.
काका-पुतण्यांची लढत
बीडमध्ये यावेळी काका-पुतण्यांची लढत पाहायला मिळणार आहे. कारण, जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांच्याकडूनही मतदारसंघ पिंजून काढला जात आहे.