नाना पटोलेंना शुभेच्छा, पण यावेळी मी 4 लाख मतांनी निवडून येईल : नितीन गडकरी
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच नागपुरात राजकीय सामना रंगायला सुरुवात झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले विरुद्ध भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची थेट लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मतांनी निवडून येईल, असा दावा गडकरींनी केलाय. तर गेल्या वेळी गडकरी लाटेत निवडून आले होते, असं म्हणत यावेळी नाना पटोले तीन […]
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच नागपुरात राजकीय सामना रंगायला सुरुवात झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले विरुद्ध भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची थेट लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मतांनी निवडून येईल, असा दावा गडकरींनी केलाय. तर गेल्या वेळी गडकरी लाटेत निवडून आले होते, असं म्हणत यावेळी नाना पटोले तीन लाख मतांनी विजयी होतील, असा दावा काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांनी केलाय.
राजकीय सामन्याचा पहिला अंक
या सामन्याचा पहिला अंक आज पाहायला मिळाला. गेल्या निवडणुकीत मी 2 लाख 80 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आलो होतो, गेल्या पाच वर्षांत अनेक विकासाची कामं केलीत. त्यामुळे यावेळी दुप्पट म्हणजे चार लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, असा दावा नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी केलाय. नाना पटोले माझे मित्र होते आणि आजही आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मी व्यक्तीगत द्वेषाचं राजकारण करत नाही, असंही यावेळी गडकरी म्हणाले.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी मोदी लाटेत निवडून आले होते, यावेळेस त्यांचा 3 लाख मतांनी पराभव होईल आणि नाना पटोले तीन लाख मतांनी विजयी होतील, असा दावा काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी केला. गेल्या पाच वर्षांत नागपुरात रोजगार निर्मिती झाली नाही, मेट्रोचं काम अपूर्ण असतानाही जबरदस्तीने उद्घाटन केलं, अशी टीकाही मुत्तेमवार यांनी केली. नागपुरात नितीन गडकरी यांना फाईट देण्यासाठी ओबीसी चेहरा असलेल्या नाना पटोले यांना उमेदवारी दिल्याचंही मुत्तेमवार म्हणाले.
नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. नागपूरमध्ये केंद्रातील दिग्गज मंत्री नितीन गडकरी भाजपचे उमेदवार आहेत, तर पक्षाअंतर्ग गटबाजीवर मात करण्यासाठी काँग्रेसने नाना पटोलेच्या रुपाने ओबीसी चेहरा निवडणुकीच्या मैदानात उतरवलाय. नागपूर लोकसभेचा निकाल काहीही असो, पण इथला राजकीय सामना मात्र नक्कीच रंगणार यात काहीही शंका नाही.