आठवलेंच्या रिपाइंमध्ये जाण्यास इच्छुक : एकनाथ खडसे
मी राष्ट्रवादीत नाही तर रामदास आठवलेंच्या 'रिपाइं'मध्ये जाण्यास इच्छुक आहे, अशा कोपरखळ्या भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (BJP leader Eknath Khadse) दिल्या.
नागपूर : मी राष्ट्रवादीत नाही तर रामदास आठवलेंच्या ‘रिपाइं’मध्ये जाण्यास इच्छुक आहे, अशा कोपरखळ्या भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (BJP leader Eknath Khadse) दिल्या. गेल्या काही दिवसांपासून खडसेंची पक्षविरोधी भूमिका आणि वक्तव्ये त्यामुळे ते भाजप सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याचे बोलले (BJP leader Eknath Khadse) जात आहे.
“मी राष्ट्रवादी नाही तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) या पक्षात जाण्यास इच्छुक आहे. यासाठी मी रामदास आठवलेंकडून परवानगी घेणार आहे”, अशी उडवा उडवीची उत्तर खडसेंनी पत्रकारांना दिली.
एकनाथ खडसे आज (18 डिसेंबर) नागपूर येथे शरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. यावर पत्रकारांनी खडसेंना विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर देत मी आठवलेंच्या पक्षात जाणार असल्याचे म्हटले. खडसेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, “मी कुणालाही भेटण्यास मोकळा आहे. राष्ट्रवादीमध्ये जाणार की नाही याबाबत निर्णय नाही”, असं वक्तव्य खडसेंनी काही दिवसांपूर्वी केले होते.
एकनाथ खडसेंच्या भेटीगाठी
एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज आहेत. मुलगी रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना भाजपच्याच नेत्यांनी पाडल्याचा आरोप खडसेंनी जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर खडसेंनी पंकजा मुंडेंची भेट घेतली होतीच, शिवाय दिल्लीत जाऊन शरद पवारांचीही भेट घेतली होती. एकनाथ खडसे हे दिल्लीत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र भाजप नेते भेटलेच नव्हते. तिथे त्यांची शरद पवारांसोबत चर्चा झाली होती. दिल्लीतून परतल्यानंतर खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज खडसे पुन्हा पवारांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात होती.
गोपीनाथ गडावर खडसेंचा हल्लाबोल
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse attack on BJP) यांनी गोपीनाथ गडावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर घणाघात केला. “देवेंद्र फडणवीसांना पक्षाचा अध्यक्ष (प्रदेशाध्यक्ष) करायचं हे गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं, मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी संमती दिली, पण ज्यांनी मोठं केलं त्यांनाच अशी वागणूक दिली”, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला.
शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून भाजपला हिणवले जात होते, मात्र त्या पक्षाला मोठे करण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडे साहेबांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही, त्यांचं वाक्य नेहमी आठवतं, हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुम्हे साथ लेकर डुबेंगे, जो संघर्ष त्यांच्या वाट्याला आला, तोच प्रसंग माझ्याही आयुष्यात, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मागील काही काळापासून चांगलाच वेग आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. त्यामुळे ते काय भूमिका घेणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. अशातच आता ऐन हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणारी पवार-खडसे भेट आता चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीदरम्यान काय मोठा निर्णय होणार की ही भेटही केवळ चर्चेचाच विषय ठरणार हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.