… तर ओवेसींना निजामासारखं हैदराबाद सोडून पळावं लागेल, योगींचा इशारा
हैदराबाद : तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका करत आहेत. तर दुसरीकडे प्रचारासाठी तेलंगणात आलेले यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ओवेसींचा समाचार घेतलाय. भाजपची सत्ता आल्यास ओवेसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल, असा इशारा योगींनी दिलाय. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये प्रचारसभेला संबोधित […]
हैदराबाद : तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका करत आहेत. तर दुसरीकडे प्रचारासाठी तेलंगणात आलेले यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ओवेसींचा समाचार घेतलाय. भाजपची सत्ता आल्यास ओवेसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल, असा इशारा योगींनी दिलाय.
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचा समाचार घेतला. मी तुम्हाला विश्वास देतो, की जसा निजाम हैदराबाद सोडून पळाला होता, तसंच ओवेसीलाही भाजपची सत्ता आल्यावर तेलंगणातून पळावं लागेल, असं योगी म्हणाले.
आमदार राजा सिंह काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, की ओवीसीचं डोकं शरीरापासून वेगळं केल्यानंतरच समाधान मिळेल. या वक्तव्यानंतर आता योगींनी हा इशारा दिलाय. यापूर्वी ओवेसींनीही भाजपवर हल्लाबोल केला होता. मदरसे आणि मुस्लीम समाजाची धार्मिक स्थळं बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकार आपल्याला पाहू इच्छित नाही, असं वक्तव्य ओवेसींनी केलं होतं.
एमआयएमला हरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार हैदराबादला येत आहेत. तर भाजपाध्यक्ष अमित शाह पाच वेळा इथे आले आहेत. यूपी आणि बंगालमध्ये जे केलंय, त्याप्रमाणेच ते आपला आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ओवेसींनी केला.
देशात सध्या निवडणुकांचं वातावरण आहे. मिझोराम, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या पाच राज्यांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 11 तारखेला लागणार आहे. पाचही राज्यांमध्ये सर्वच पक्ष पूर्ण तयारीने मैदानात उतरले आहेत.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये मतदान पार पडलं आहे. पण भाजपची सत्ता असलेलं राजस्थान आणि टीआरएसची सत्ता असलेल्या तेलंगणात अजून मतदान बाकी आहे. 7 तारखेला या दोन्ही राज्यातलं मतदान झाल्यानंतर एकाच दिवशी पाच राज्यांचा निकाल लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पाच राज्यांच्या निवडणुकांना अत्यंत महत्त्व आहे.