धनुष्यबाण शिंदे गटाला गेलं तर? उद्धव ठाकरे गटाचा प्लॅन B काय? तयारी सुरू?
येत्या 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर यासंबंधी महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
मुंबईः महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष (Maharashtra Politics) आता अंतिम टप्प्यात आल्याची चिन्ह आहेत. येत्या काही दिवसात शिवसेना (Shivsena) कुणाची, धनुष्यबाण कुणाचा यावर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) शिक्कामोर्तब होईल. 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर यासंबंधी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आतापर्यंत झालेले युक्तिवाद आणि भूतकाळातील खटल्यांचा दाखला घेतला तर धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. असं झालं तर उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं ठाकेल. पण या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी ठाकरे गटाने प्लॅन बीची तयारी सुरु केल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागला तर दोन प्रकारे तयारी सुरु करण्यात आली आहे. एक म्हणजे ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देईल.
तर दुसरा प्लॅनसाठीही तयारी सुरू झाल्याचं सांगण्यात येतंय. पक्षासाठी निवडणूक चिन्ह आणि नाव ठरवण्याचा फैसला ठाकरे गट जनतेवर सोपवेल. लोकांच्या मतानुसार, पक्षाचं नवं चिन्ह आणि नाव निश्चित केलं जाईल.
तज्ज्ञांच्या मते, निवडणूक आयोगाने सादिक अली केसचा आधार घेतला तर एकनाथ शिंदे गटाकडून निर्णय लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाने या निकालानंतर काय करायचे, याचे नियोजन सुरु केल्याचं कळतंय.
सुप्रीम कोर्टातली सुनावणी कधी?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची महत्त्वाची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुरू आहे. शिवसेनेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई तसेच राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार यासंबंधीच्या महत्त्वाच्या याचिकांवर ही सुनावणी सुरु आहे.
येत्या 14 फेब्रुवारी रोजी यासंबंधीची सुनावणी होणार आहे. तत्पुर्वी निवडणूक आयोगासमोर शिवसेना कुणाची हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत 55 पैकी 40 आमदारांना घेऊन गुवाहटी गाठलं होतं. त्यांच्यासोबत १० अपक्ष आमदारदेखील होते. एकनाथ शिंदेंच्या या ताफ्याने आधी सूरत आणि त्यानंतर गुवाहटी गाठलं होतं. यामुळे महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर झालं.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिली आणि त्यानंतर शिंदे-भाजप सरकार स्थापन केलं. दरम्यान शिवसेनेने गुवाहटीला गेलेल्या 16 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई केली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे.