मोदी, मोदी करणाऱ्या नवऱ्याला जेवण…, कुणी केली गंमतीने घोषणा, काय आहे कारण?
18 वर्षांवरील सर्व महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली. या घोषणेवर महिलांशी संवाद साधताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी गंमतीत पती जर मोदी, मोदी बोलत असतील तर त्यांना रात्रीचे जेवण देऊ नका असे म्हटले.
नवी दिल्ली | 10 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिला मतदारांसाठी एक लक्षवेधी घोषणा केलीय. दिल्ली सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांना मोठी भेट दिली. दिल्लीतील 18 वर्षांवरील सर्व महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे. याच घोषणेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महिलांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी गंमतीने जर तुमचा पती मोदी, मोदी करत असेल तर नवऱ्याला जेवण देऊ नका असे म्हणालेत. केजरीवाल जरी हे गंमतीने म्हणाले असले तरी त्यामागे एक मोठे कारण आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सर्व महिलांनी मतदान करावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी पुरुषांनाही आम आदमी पार्टीला मत देण्याचे आवाहन केले. हसत हसत ते म्हणाले, ‘तुम्हाला तुमच्या घरातील सर्व पुरुषांनाही मतदान करावे लागेल. अनेक पुरुष मोदी मोदी म्हणत आहेत. फक्त, तुम्हीच त्यांचे मन बदलवू शकता. तुमचा नवरा मोदी म्हणत असेल तर त्याला सांगा की तुम्हाला संध्याकाळचे जेवण मिळणार नाही.’ असे ते म्हणाले.
प्रत्येक महिलेने पतीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगा. पतीला पत्नीने सांगितलेल्या गोष्टीचे पालन करावेच लागेल. सर्वांनी केजरीवाल यांना मतदान करण्याचे आवाहन करावे. सर्व माता आपल्या मुलांना शपथ देतील. सर्व बहिणी आपल्या भावाला आणि वडिलांना शपथ देतील असे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
महिलांना आवाहन करण्यामागचे कारण काय?
दिल्ली विधानसभेत लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये आप पक्षाने प्रचंड मते मिळविली. दिल्लीत सलग तीन वेळा सरकार स्थापन केले. मात्र, आम आदमी पक्षाला दिल्ली या बालेकिल्ल्यातून एकही खासदार लोकसभेत पाठवता आला नाही. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे यावेळी पक्षाने लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.
भाजपला टक्कर देण्यासाठी केजरीवाल यांनी काँग्रेससोबत युती केली. येथील सातपैकी चार चार जागांवर आपने उमेदवार दिले आहेत. दिल्लीचे सातही खासदार निवडून आले तर केंद्र सरकार दिल्लीतील जनतेची कामे रोखू शकणार नाही, असे सांगून केजरीवाल मते मागत आहेत. याशिवाय त्यांनी ‘केजरीवाल संसदेत भी होंगे, दिल्ली खुश होगी’ असा नाराही दिला आहे.
गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपच्या यशामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा वाटा अधिक असल्याचे दिसून आले आहे. परंतु, दिल्लीमध्ये महिलांपेक्षा पुरुषांनी भाजपच्या बाजूने जास्त मतदान केले आहे. तर, महिलांनी आम आदमी पक्षाला जास्त मते दिली आहेत. त्यामुळेच केजरीवाल यांनी या निवडणुकीत महिलांना साद घातली आहे. एका सर्वेक्षणानुसार, 60 टक्के पुरुषांनी भाजपला आणि 54 टक्के महिला मतदारांनी पंतप्रधान मोदी यांना मतदान केले. तर, 22 टक्के महिलांनी आम आदमी पक्षाला पसंती दिली तर केवळ 14 टक्के पुरुषांनी केजरीवाल यांना मतदान केले अशी आकडेवारी समोर आली आहे.