मला नोटीस पाठवलीत तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन; नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा
आता वरुण सरदेसाई मला कोर्टाच्या नोटिसीची धमकी देऊन माझ्यावर दबाव आणू पाहत आहेत का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. | Nitesh Rane
मुंबई: सचिन वाझे यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर आणल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी आम्हाला नोटीस पाठवायची धमकी दिली. मात्र, त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची अनेक प्रकरणं बाहेर काढू, असा इशारा भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला. आम्ही 39 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का? ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, असे नितेश राणे यांनी सांगितले. (Nitesh Rane slams Shivsena leader Varun Sardesai)
नितेश राणे यांनी सोमवारी वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी पत्रकारपरिषद घेत नितेश राणेंवर पलटवार केला होता. तसेच नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन, असेही वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी मंगळवारी पुन्हा पत्रकारपरिषद घेऊन वरुण सरदेसाई यांना लक्ष्य केले. तपासयंत्रणांनी सचिन वाझे आणि वरुण सरदेसाईंच्या संबंधांचा तपास करावा म्हणून मी माहिती उघड केली. आता वरुण सरदेसाई मला कोर्टाच्या नोटिसीची धमकी देऊन माझ्यावर दबाव आणू पाहत आहेत का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. माझ्याकडे असलेली माहिती तपास यंत्रणांनी मागितल्यास मी देईन, असेही नितेश राणे यांनी सांगितले.
मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय: सरदेसाई
राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.
त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असेही वरुण सरदेसाई यांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या :
वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो पण तो पुढे कुणाला देतो?; नितेश राणेंचा गंभीर आरोप
नितेश राणेंनी खंडणीचा आरोप केलेले वरुण सरदेसाई कोण आहेत?
(Nitesh Rane slams Shivsena leader Varun Sardesai)