मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये महाविकासआघाडी सरकारवर विरोधकांकडून करण्यात आलेले गंभीर आरोप आणि लॉकडाऊनच्या (Lockdown) निर्णयाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एक ट्विट करुन उत्कंठा वाढवली आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सूचक भाषा वापरली आहे. ‘आशीर्वाद दिखाई नही देते ….. परंतु असंभव को संभव बना देते हैं !!!’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. त्यामुळे आता संजय राऊत आणि ठाकरे सरकारला नेमका कोणाचा आशीर्वाद मिळाला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. (Shivsena leader Sanjay Raut new tweet)
आशीर्वाद दिखाई नही देते …..
परंतु असंभव को संभव बना देते हैं !!!—-
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 4, 2021
तत्पूर्वी संजय राऊत यांनी रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाचे समर्थन केले. मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय हा काही आनंदाने घेत नाहीत. आपातकालीन परिस्थितीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना असे निर्णय घेणे अपरिहार्य असते. अशावेळी आपला वैयक्तिक दृष्टीकोन वेगळा असला तरी एक राज्य म्हणून महाविकासआघाडीतील घटकपक्ष आणि विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
यावेळी संजय राऊत यांनी कोरोना परिस्थितीतील महाराष्ट्राच्या कामगिरीचे कौतुक झाले पाहिजे, असे म्हटले. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत, ही बाब मान्य आहे. मात्र, महाराष्ट्राचा कोरोना चाचण्याच जास्त होत असल्यामुळे रुग्णही जास्त सापडत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतूक केलंच पाहिजे.
दुसऱ्या राज्यांमध्ये इतक्या मोठ्याप्रमाणावर कोरोना टेस्ट होत नाहीत. कोण कुठे जातंय, कशाने मृत्यू झाला, का आजारी आहे, याची कसलीच माहिती इतर राज्यांकडून ठेवली जात नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारशी आमचं कोणतंही वैयक्तिक भांडण नाही. केवळ महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून राज्यकर्त्यांची कोंडी करायची, हे योग्य नव्हे. हे राष्ट्रीय एकात्मता आणि संसदीय लोकशाहीला धरुन नाही. कोरोनामुळे (Coroanvirus) महाराष्ट्र कोलमडला तर देशही कोलमडेल, ही गोष्ट विरोधी पक्षनेत्यांना माहिती असायला हवी, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.
संबंधित बातम्या:
‘आमचं मोदींशी भांडण नाही; महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल हे फडणवीसांना समजायला हवं’
प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर जसे अत्याचार केले अगदी तसंच घडतंय; मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका
(Shivsena leader Sanjay Raut new tweet)