आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर वंचितला सत्ता द्या : प्रकाश आंबेडकर
देशभरात आरक्षणावरुन गोंधळ सुरु असल्याचं म्हणत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. सर्व घटकांचं आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.
नवी दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. देशभरात आरक्षणावरुन गोंधळ सुरु असल्याचं म्हणत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. सर्व घटकांचं आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.
मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. आमचं 27 टक्के आरक्षण संपुष्टात येईल, अशी भीती ओबीसींनाही आहे. लोकांच्या मनातून ही भीती काढण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना कोणताही प्रयत्न करत नाही. ओबीसी आणि मराठा आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सत्ता, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं.
मराठा आणि ओबीसी आरक्षण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून देऊ. ओबीसी आरक्षणाला अ आणि मराठा आरक्षणाला ब असा गट दिला असता, तर ओबीसी आरक्षण जाणार नाही यांची भीती निर्माण होणार नाही. ओबीसी आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेची तयारी सुरु केल्यानंतर आता राजकीय वातावरणही तापू लागलंय. कारण, कोणतीही चर्चा न होताच त्यांनी काँग्रेसला फक्त 40 जागांचा प्रस्ताव दिलाय. लोकसभेत आम्ही जास्त मतं मिळवली असं म्हणत वंचितकडून हा प्रस्ताव देण्यात आलाय. काँग्रेसला मिळणारी मतं अनेक ठिकाणी वंचितला मिळाली आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे काँग्रेसही विधानसभेसाठी सावध पाऊल टाकत आहे. पण प्रकाश आंबेडकरांना 40 जागांचा प्रस्ताव देऊन सूचक संकेत दिले आहेत.