उद्धव ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक, पुढील रणनीती ठरवणार!
आज बारा वाजता उद्धव ठाकरे गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पक्षाची पुढील रणनीती ठारवली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : निवडणूक आयोगाकडून (Uddhav Thackeray) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुढील निर्णय येईपर्यंत उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाही. तसेच शिवसेना (Shiv sena) हे नाव देखील वापरता येणार नाहीये. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आज बारा वाजता उद्धव ठाकरे गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पक्षाची पुढील रणनीती ठारवली जाण्याची शक्यता आहे. तसेच सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी दोन्ही गटाला तीन चिन्हांची निवड करून ते निवडणूक आयोगाकडे सादर करावे लागणार आहेत.
‘निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलीय’
दरम्यान दुसरीकडे शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय आणि अनपेक्षित असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. आयोगानं आधी बोलण्याची संधी द्यायला हवी होती. कालचा निर्णय अनपेक्षित होता. आता निवडणूक आयोगाकडून ज्या चिन्हांचा पर्याय दिला जाईल त्यातून चिन्हाची निवड करण्यात येणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाकडून तीन पर्याय
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे गटाकडून नव्या चिन्हाची चाचपणी सुरू आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ला विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्हाबाबत तीन पर्याय देण्यात येणार आहेत. त्यामध्ये त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा समावेश असणार आहे.