वंचित-एमआयएम ही नैसर्गिक युती, प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत असते तर किंग झाले असते!; इम्तियाज जलील यांचं विधान
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम-वंचित आघाडीवर भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीतून बाहेर पडायला नको होतं, असं ते म्हणालेत.
औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी एमआयएम-वंचित आघाडीवर भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) आणि आमची युती ही लोकांची युती होती. आंबेडकर आमच्यासोबत राहिले असते तर ते किंग किंवा किंगमेकर झाले असते. पण ते सोबत राहिले नाहीत याचं आम्हाला दु:ख वाटते. बाळासाहेबांचे कुठेतरी चुकले असणार त्यामुळे हे घडू शकले नाही. वंचित आणि एमआयएम ही नैसर्गिक युती होती, असं जलील म्हणालेत.
जलील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ऑफर दिली आहे. त्यांच्या समाजाचे नेते व्हावे.पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये आता फक्त जा म्हणून सांगायचं बाकी राहिलं आहे. पंकजा मुंडे जर बाहेर पडल्या तर राज्यातले सगळे मोठे नेते पंकजा मुंडे यांच्यासोबत येतील. सध्या भाजप पंकजा मुंडे यांना रबरी शिक्का म्हणून वापरत आहे, असंही जलील म्हणालेत.
पंकजा मुंडे यांनी बाहेर पडावं. आम्हाला सोबत घ्यावं आणि पाहावं महाराष्ट्रात काय परिवर्तन होतं ते, असंही जलील म्हणालेत.
मोदी है तो मुंकिन है म्हणता तर मग अडाणी आणि टाटा यांच्यात असं काय आहे की त्यांना जमतं आणि मोदींना जमत नाही, असा सवाल जलील यांनी विचारला आहे.
औरंगाबाद महापालिकेत कंत्राटी कामगारांच्या नावाखाली ठेकेदार महापालिकेतील तीन अधिकारी आणि 2 आमदार आणि एक मंत्री घोटाळा करत आहेत. महापालिका दरमहिना साडेतीन कोटी रुपये पगारासाठी देते. पण ठेकेदार फक्त अडीच कोटी पगार करतो आणि बाकीचे पैसे अधिकारी आणि नेत्यांमध्ये वाटप होतात, म्हणून मी 6 तारखेला मोर्चा काढत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
मी सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांना खुलं चॅलेंज करतो. जर मी मॅनेज केल्याचा खोटा आरोप करत असेन तर माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा, असं ओपन चॅलेंज जलील यांनी दिलंय.