Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं निमंत्रण! पोलीस आयुक्तांच्या भेटीत नेमकी काय चर्चा?
राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना सभेपूर्वी इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलंय.
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची 1 मे, महाराष्ट्र दिनी औंरगाबादेत जाहीर सभा होणार आहे. मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा राज ठाकरे यांनी उचलून धरलाय. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) 3 मे चा अल्टिमेटम दिलाय. तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही राज्यात जोरदार राजकारण सुरु आहे. अशावेळी राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना सभेपूर्वी इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलंय. राज ठाकरे औरंगाबादेत येत आहेत. सभेला जाण्यापूर्वी त्यांनी यावं, आम्हा सर्वांसोबत इफ्तार करावा आणि त्यानंतर त्यांनी स्टेजवर जाऊन काय बोलायचं ते बोलावं, असं जलील यांनी म्हटलंय.
राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं निमंत्रण
औरंगाबाद आणि महाराष्ट्राची परंपरा आहे की कोणता उत्सव आपण साजरा करतो तर तो सर्वजण मिळून एकत्रितपणे साजरा करतो. मी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांना विचारलं की आम्ही तुम्हाला शहरात शांतता टिकून राहण्यासाठी काय करु शकतो? आमच्याकडून जी मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तयार आहोत. दुसरी बाब ही की राज ठाकरे औरंगाबादेत येत आहेत. त्यांची सभा होतेय. मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी सभेपूर्वी आमच्याकडे यावं. सर्व हिंदू-मुस्लिम मिळून इफ्तार करू. सर्वांनी एकत्र येत इफ्तार केला तर खूप चांगला संदेश जाईल, अशा शब्दात जलील यांनी एक प्रकारे राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं निमंत्रणच दिलं आहे.
दुकानदार, व्यावसायिकांना चिंता सतावतेय
जलील म्हणाले की, रमजान हा असा महिना आहे ज्याची वाट प्रत्येक मुस्लिम बांधव वर्षभर पाहत असतो. मागील दोन वर्षात कोरोनामुळे कुणीही उत्सव साजरा करु शकला नाही. व्यवसाय होऊ शकला नाही. आज अनेक दुकानदारांनी माल भरून ठेवला आहे. हे कुण्या एका जातीचे दुकानदार नाहीत तर सर्व जातीचे आहेत. तेव्हा त्यांना आपल्या व्यवसायाची चिंता सतावतेय. अशावेळी मी औरंगाबाद जिल्ह्यातील जनतेला आश्वासन देतो की आपण सर्वजण मिळून या शहराची जी पंरपरा आहे, ती पुढे घेऊन जाऊ शकतो. 99 टक्के लोक शांतताप्रिय असतात. 1 टक्के लोकांनाच अशांतता हवी असते. आता पोलिसांची जबाबदारी आहे की अशा 1 टक्के लोकांना, मग ते कोणत्याही धर्माचे, कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कंट्रोल करावं आणि त्यासाठी पोलीस सक्षम आहेत.
‘जबरदस्ती नको, नाहीतर त्याचा अंत नसेल’
मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर बोलताना जलील म्हणाले की, गृहमंत्र्यांनी याबाबत खुलासा केलेला आहे. आम्हाला वाटतं की या मुद्द्यावर सरकार, पोलीस आणि प्रशासनाने हाताळावा. जो कायदा आहे तो सर्वांसाठी समान आहे. आमच्यासाठी वेगळा कायदा नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचा कोणता आदेश असेल तर त्याचं पालन होणं गरजेचं आहे. मात्र जोर जबरदस्ती नको, नाहीतर त्याचा काही अंत नसेल, अशी भूमिका जलील यांनी व्यक्त केली आहे.