महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक चर्चा आहे ती, बारामतीची. इथे काका विरुद्ध पुतण्या असा सामना आहे. त्यामुळे सगळ्या देशाच लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा जाहीर केला. अजित पवार महायुतीमध्ये आहेत, त्यामुळे बारामतीमध्ये मनसेचा पाठिंबा अजित पवारांना आहे. मनसेमध्ये राज ठाकरेंचा आदेश सर्वोच्च असतो. मनसैनिक राज्यभरात महायुतीच्या प्रचारात सहभागी झाल्याच दिसतय. परंतु बारामती लोकसभा मतदार संघात मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी हा आदेश झुगारल्याची चर्चा आहे.
त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याऐवजी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केल्याचा आरोप दुसरे मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र गारुडकर यांनी केला आहे. त्यांनी तसे पत्रक जाहीर केले आहे. सध्या सोशल मीडियावर संतोष दसवडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आमदार रोहित पवारांबरोबर असलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावरूनच दसवडकर यांनी रोहित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला असल्याचा आरोप गारुडकर यांनी केला आहे.
रवींद्र गारुडकर यांनी पत्रकात काय म्हटलं आहे?
“राज साहेब ठाकरे यांनी देशाच्या उज्वल भविष्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राजसाहेबांचा आदेश झुगारुन मनसे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया ताईंना बारामती लोकसभेसाठी पाठींबा दिला असल्याचे दिसत आहे. राजसाहेबांचा आदेश डावलून अशा प्रकारची “गद्दारी” पक्ष सहन करणार नाही. संबंधितांवर हकालपट्टीची त्वरित कारवाई होणार हे निश्चित आहे. तरी सर्व निष्ठावान मनसे सैनिकांनी बारामती लोकसभेच्या उमेदवार “सुनेत्रावहिनी अजिततदादा पवार” यांच्या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी होवून त्यांना प्रचंड बहूमताने निवडून आणून पक्षात “गद्दारी” करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्यावे”
मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यावर काय प्रतिक्रिया देणार?
संतोष दसवडकर यांचा नक्की पाठिंबा कुणाला? याकडे जिल्ह्यातील मनसैनिकांचं लक्ष लागलय. पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कुस्ती संघाच्या कार्यक्रमादरम्यान सोबतच्या काही पहिलवानांसोबत गेले असताना त्या ठिकाणी रोहित पवार भेटले आणि त्याचं वेळेस हा फोटो काढल्याच त्यांच्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितलंय.