Explainer : लोकसभेची दुसरी निवडणुक, महाराणी कॉंगेसकडून लढल्या, जवाहरलाल नेहरू यांचा होता दबाव, कारण…
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ग्वाल्हेरचे महाराजा जिवाजीराव सिंधिया राजकारणापासून दूर राहिले. त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. पण, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या राजघराण्याला राजकारणात आणले. त्याचे कारणही तसे मोठे होते.
नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : मध्यप्रदेशमध्ये सिंधिया हे राजघराणे फार मोठे राजघराणे आहे. 1947 मध्ये ब्रिटीश सरकारने संस्थानांना दोन पर्याय दिले होते. त्यातील पहिला पर्याय होता संस्थानांनी वेगळे राहावे आणि दुसरा पर्याय होता तो संस्थानांनी भारत किंवा पाकिस्तानमध्ये विलीन व्हावे. ग्वाल्हेरचे महाराज जिवाजीराव सिंधिया यांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. जिवाजीराव हे मध्य भारत प्रदेशचे प्रमुख होते. देश स्वतंत्र झाला आणि 1951 मध्ये पहिली सार्वत्रिक लोकसभा निवडणुक झाली. महाराज जिवाजीराव यांना राजकारणात काही स्वारस्य नव्हते. पण, मध्य प्रदेशमध्ये हिंदू महासभेला लोकसभेच्या दोन जागा मिळाल्या. तर, विधानसभेतही 11 जागा जिंकल्या होत्या.
हिंदू महासभेच्या या यशामुळे कॉंग्रेसला चिंता वाटू लागली. ग्वाल्हेरचे महाराज जिवाजी राव सिंधिया आणि त्यांच्या पत्नी विजयाराजे सिंधिया यांच्याकडून हिंदू महासभेला संरक्षण मिळत असल्याचा संशय काँग्रेसला होता. 1956 साली देशात राज्य पुनर्रचना कायदा लागू झाला. त्यामुळे पूर्वीच्या ग्वाल्हेर राज्याची मध्य भारत म्हणून असलेली राष्ट्रीय ओळख संपली आणि मध्यप्रदेश नावाचे नवे राज्य अस्तित्वात आले. या निमित्त आणि कॉंग्रेसचा आपल्यावरील शंका दुर करण्यासाठी राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली.
विजयाराजे यांच्यावर असा दबाव
पंतप्रधान नेहरू यांनी त्यावेळी विजयाराजे सिंधिया यांना जर सर्व काही ठीक असेल तर जिवाजीराव यांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवायला सांगा असे सांगितले. पतीला राजकारणात रस नाही हे विजयाराजे ओळखून होत्या. त्यांनी तसे स्पष्ट नेहरू यांना सांगितले. नेहरू यांनी विजयाराजे यांना लाल बहादूर शास्त्री आणि गोविंद बल्लभ पंत यांची भेट घेण्यास सांगितले. त्या दोघांनीही जिवाजीराव यांना निवडणूक लढवता येत नसेल तर विजयाराजे यांनीच काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असा दबाव आणला.
विजयाराजे आणि नेहरू यांच्या भेटीनंतर काही दिवसांनी लोकसभा निवडणूक जाहीर झाली. देशाची 1957 साली झालेली ती दुसरी सार्वत्रिक निवडणूक होती. गुना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयाराजे यांनी निवडणूक लढवली. अशा प्रकारे विजयराजे सिंधिया यांनी राजकारणात प्रवेश केला. त्या निवडणुकीत त्यांनी हिंदू महासभेचे उमेदवार व्ही. जी. देशपांडे यांचा 1,18,578 मतांनी पराभव केला.
हिंदू महासभेचे स्वयंघोषित सदस्य यांनी केला विजयाराजे यांचा प्रचार
महाराज जिवाजीराव हे या निवडणूक प्रचारापासून दूर राहिले होते. त्यांनी आपले सरदार आंग्रे यांना विजयाराजे यांच्यावर निवडणूक व्यवस्थापक म्हणून जबाबदारी दिली होती. विशेष म्हणजे आंग्रे हे स्वतः हिंदू महासभेचे स्वयंघोषित सदस्य होते. मात्र त्यांनीही विजयाराजे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खुद्द विजयराजे यांनी फारसा प्रचार केला नाही. त्यांच्या जागी आंग्रे यांनी अनेक सभा घेऊन ‘महाल’साठी मते मागितली होती.
विजयराजे यांची लोकसभेतील कामगिरी
विजयराजे या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्या तरी त्या फारशा सक्रिय नव्हत्या. लोकसभेत त्यांची उपस्थिती 50 टक्क्यांहून कमी होती. जिवाजीराव यांची ढासळलेली तब्येत हे त्याचे एक प्रमुख कारण होते. काही काळाने विजयराजे यांनी काँग्रेससोडून जनसंघात प्रवेश केला आणि भाजपच्या संस्थापक सदस्या झाल्या. तेव्हापासून सिंधिया कुटुंबाने भारतातील दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये आपले मजबूत स्थान कायम राखले आहे.