कोकणात काही ठिकाणी सेनेची मोठी पडझड झाली, संजय राऊतांची कबुली
कोकणात काही ठिकाणी सेनेची मोठी पडझड झाली, अशी कबुली शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीय.
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांचे बालेकिल्ले ढासळले तर अनेक नवख्या उमेदवारांनी यश खेचून आणलं. कोकणात पुन्हा एकदा भाजप-सेनेमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली. राणेंनी भाजपनेच कोकण मारल्याचा दावा केलाय तर भास्कर जाधवांनी शिवसेनेला कोकणात अभूतपूर्व यश मिळवल्याचं नमूद केलं. अशा सगळ्या राजकीय सुंदोपसुंदीत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून कोकणात काही ठिकाणी सेनेची मोठी पडझड झाली, अशी कबुली शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीय. (In some places in Konkan, Shivsena setback, confessed Says Sanjay Raut)
कोकणात सिंधुदुर्गात राणेंना सत्ता राखण्यात यश आलंय. तसंच अनेक ठिकाणी सेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ग्रामपंचायतीवर भाजपने कमळ फुलवलं. या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला आहे. निकाल हाती आल्यानंतर लगोलग कोकणात राणेंना धक्का देणारा अजून जन्माला यायचाय, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी सेनेला आव्हान दिलं.
आजच्या सामना अग्रेलखातून एकंदर महाराष्ट्र ग्रामपंचायत निकालाचा लेखाजोखा मांडताना राज्यभरातील साडेतीन हजारांवर ग्रामपंचायतींच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे, असं सांगताना कोकणात मात्र काही ठिकाणी सेनेची मोठी पडझड झाली, अशी खंत राऊतांनी आवर्जून व्यक्त केलीय.
“विदर्भ-मराठवाड्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने झेप घेतली आहे, असं सांगताना कोकणात शिवसेनाच आहे, पण काही ठिकाणी मोठी पडझड झाली. त्याची झाडाझडती नंतर घेता येईल. मात्र राज्याच्या संपूर्ण निकालाची गोळाबेरीज पाहता भारतीय जनता पक्षाला लोकांनी झिडकारले आहे”, असं राऊत यांनी म्हटलंय.
सेनेचा राणेंना धक्का- वैभव नाईक
कणकवलीत नितेश राणेंच्या मतदारसंघात 3 ग्रामपंचायतींपैकी 2 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत. शिवसेनेने राणेंना धक्का दिला आहे, असे विधान करत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना डिवचले होते.
राणेंना धक्का देणारा अजून जन्माला यायचाय- नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 70 पैकी 57 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेला धक्का दिल्ला आहे. यापूर्वी शिवसेनेकडे असलेल्या ग्रामपंचायती यावेळी भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे राणेंना धक्का देणारा अजून कुणी जन्माला आलेला नाही, असं म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी शिवेसेनेचे आमदार वैभव नाईक यांना प्रत्युत्तर दिलं.
लोकांचा भाजपवर विश्वास, कोकणात सेना आता नावालाही उरणार नाही- नितेश राणे
“सिंधुदुर्गातील 70 पैकी 57 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. आम्ही शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेकडे यापूर्वी असलेल्या तोडवली-बावशी, कुपवड़े, चिंदर, चुनवरे कोलगाव या ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या आहेत. या निकालावरून राज्यातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे, हे स्पष्ट होते. कोकणात आता शिवसेना नावालाही उरणार नाही” असे नितेश राणे म्हणाले.
(In some places in Konkan Shivsena setback confessed Says Sanjay Raut)
हे ही वाचा
Gram Panchayat Election Results 2021 : जाऊबाई जोरात, काट्याची लढत घरात, जाऊबाईंच्या लढतीत कोण जिंकलं?
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : अवघ्या चार मतांनी विजय, सासू-सूनेच्या लढतीत चाव्या कोणाकडे?
सरपंचपद गेल्यावेळी निम्मं-निम्मं वाटून घेतलं, आता सासूबाईंविरोधात सूनेचा शड्डू