मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव राज्याचा कारभार सांभाळतात; राष्ट्रवादीकडून श्रीकांत शिंदेंचा फोटो ट्विट करत एकनाथ शिंदेंवर निशाणा
राष्ट्रवादीच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री (CM) आहेत मात्र कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच पाहतात. राज्यातील सगळे निर्णय तेच घेतात असा आरोप विरोधकांकडून अनेकदा झाला. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. हा फोटो ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत श्रीकांत शिंदे हेच राज्याच्या कारभार सांभाळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला आहे. आता या फोटोवरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
काय आहे आरोप?
रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, ‘खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूये. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?’ अशी टीका वरपे यांनी केली आहे.
यापूर्वीही अनेकदा टीका
दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे फक्त नावालाच मुख्यमंत्री आहेत, राज्याच्या कारभार देवेंद्र फडणवीस सांभाळत असून, तेच सर्व निर्णय घेत असल्याची टीका विरोधकांकडून सुरू आहे.
राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे असं काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.