नंदुरबार : ’50 खोके, एकमद ओक्के’ हा नारा सत्ताधाऱ्यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाही. ठाकरे गटाचा (Thackery Group) हा घाव शिंदे गटाच्या चांगलाच वर्मी लागला आहे. विरोधकांनी 50 खोक्यावरुन रान माजवले आहे. ही बोचरी टीका शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. पश्चिम बंगालमधील एका मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीकडे 27 कोटी रुपये सापडल्याचा हिशेब राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिला. मग 50 खोके नेण्यासाठी एक ट्रक तर लागेल असा पलटवार केला. त्यामुळे आता विरोधकांना 50 खोके सत्ताधाऱ्यांनी कसे नेले, याचा हिशेब तर द्यावाच लागेल, नाही का?
नंदुरबार येथील पाणी पुरवठ्यासंदर्भातील एका कार्यक्रमादरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहाजी बापू पाटील यांचा राज्यभर गाजलेला डायलॉग म्हटला आणि सभेत एकच हश्या पिकला.
पण पुढच्यात वाक्याला गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना आडव्या हाताने घेतले. 50 खोक्यावरुन झालेले आरोप, टिकेवर त्यांनी मन मोकळे केले. त्यांच्या संतापाला वाट मोकळी करुन दिली.
पश्चिम बंगालमधील राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापा मारला होता. त्यावेळी त्यांच्याकडे 20 कोटी रोख आणि कोट्यवधींचे दागिने सापडले होते. छाप्यात एकूण 27 कोटींची संपत्ती उघड झाली होती. रोख रक्कम मोजण्यासाठी 27 मशीन लागल्या होत्या.
नेमका हाच धागा पकडून गुलाबराव पाटील यांनी 27 कोटी रुपये नेण्यासाठी एक टेम्पो लागल्याचा दावा करत 50 खोक्यासाठी तर ट्रॅक लागला असता, असा पलटवार विरोधकांवर केला.
50 खोक्यांच्या आरोपावरुन गुलाबराव पाटील यांच्या मनातील खदखद यानिमित्ताने पुढे आली. विरोधकांच्या या आरोपाने शिंदे गटातील नेत्यांच्या वर्मावर बोट ठेवल्याचे सातत्याने दिसून येत आहे.