राम मंदिराचे उद्घाटन हा मोदीजींसाठी अपशकून ठरणार; कुणी केला दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याला समाजातील विविध स्तरातील नागरिक आणि राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. कॉंग्रेसने या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर | 12 जानेवारी 2024 : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या मंदिराच्या बांधकामावरुन आता हिंदू धर्माच्या शंकराचार्यांनी टीका केली आहे. कोणत्याही मंदिराचे बांधकाम पूर्ण केल्याशिवाय त्याचे उद्घाटन करणे योग्य नसल्याचे शंकराचार्यांनी म्हटले असून उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात आता विविध विरोधी राजकीय पक्षांकडून टीका होत आहे. राम मंदिराचे उद्घाटन राम नवमीला देखील करता आले असते. तोपर्यंत मंदिर पूर्ण देखील झाले असते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी केवळ निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून हा घाट घातल्याचा आरोप होत आहे. यावर आता राम मंदिराचे उद्घाटन हा मोदीजींसाठी अपशकून ठरणार असल्याची टीका एका आमदाराने केली आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन अत्यंत घाई घाईने मंदिर पूर्ण न होताच केले जात आहे. कोणत्याही मंदिराचे उद्घाटन हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच केले जाते. त्यामुळे अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनास येण्यास शंकराचार्यांनी विरोध केला आहे. या प्रकरणात सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. शंकराचार्य जे आपले धर्मगुरु आहेत. हिंदू धर्माचे सर्वेसर्वा आहेत, त्यांनीच हा इव्हेंट बायकॉट केला आहे. 11 एप्रिलला राम नवमी होती, त्यादिवशी मोठ्या थाटात घेऊ शकले असते आणि तोपर्यंत बांधकाम ही पूर्ण झालं असतं. या सरकारला एवढी घाई का आहे ? त्यामुळे बांधकामापूर्वी प्राणप्रतिष्ठा करणे हे फक्त इलेक्शनसाठी करतायत हे आता प्रूव्ह झालं आहे अशी टीकाही कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरच वाढतात. पण जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाहीत ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना कळायला हवे असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिथे जातील तिथे धर्म, जातपातचं करतात अशीही टीका त्यांनी केली आहे. हिंदू धर्माचे चार शंकराचार्य म्हणालेत की, कोणत्याही वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्यापूर्वी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही. परंतू मोदीजी जे करतायत ते इलेक्शनला सामोरं ठेऊन करतायत असेही त्या म्हणाल्या.
हुतात्मा दिन
सोलापूरातील चार हुतात्मे हे वेगवेगळ्या जातीधर्मातील असले तरी आपल्या मातीसाठी त्यांनी बलिदान दिलं. चार हुतात्म्याचे प्रतिक हे देशासाठी आज महत्वाचं आहे. या मातृभूमीने कधी भेदभाव केला नाही. ज्यांनी मातृभूमीसाठी रक्त वाहीले त्यांच्या रक्ताची कधी जातजमात वेगळी नव्हती असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण मातृभूमीसाठी काम करत आहोत, ते करताना आपण जातपात आणि धर्माच्या नावावर समाजाला तोडण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या हातून घडणार सर्वात मोठं पाप असेल असेही त्या म्हणाल्या.
यापुढे मतदान तरी होऊ देतील की नाही !
विधानसभा अध्यक्षांनी दिलेला शिवसेना आमदार अपात्रेचा निर्णय हा अपेक्षित होता. हे सगळंच त्यांच्या बाजूने चालणार आहे. कितीही चुकीचं असलं तरी हे सरकार त्यांच्याच बाजूने चालणार आहे. यापुढे लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतिक असणार मतदान तरी ते होऊ देतील की नाही याबाबत शंका असल्याचे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.