नवी दिल्लीः देशाच्या 14 व्या उपराष्ट्रपती पदासाठी (Vice president Election) आज मतदान होत आहे. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) आणि विरोधी पक्षातून मार्गारेट अल्वा (Margaret Alwa) या यूपीएच्या उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी पक्षाने उमेदावर दिला असला तरीही यंदाची ही निवडणूक राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीप्रमाणेच औपचारिक असेल. तृणमूल काँग्रेसने मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेत मोठी फूट पडली आहे तर चार विरोधी पक्षांनी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना समर्थन देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होईल, अशी चिन्ह आहेत. संसद भवनात सकाळी दहा वाजेच्या सुमारास मतदानाला सुरुवात होईल. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. त्यानंतर तत्काळ मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील.
उपराष्ट्रपती पदासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार मतदान करतात. लोकसभेतील 543 आणि राज्यसभेतील 243 सदस्य तसेच राज्यसभेतील 12 नियुक्त खासदारही आज मतदान करतील. सध्या लोकसभेत भाजप खासदारांची संख्या 303 आहे तर राज्यसभेत भाजपचे 93 खासदरा आहेत. उपराष्ट्रपती पदातील एकूण मतांचा आकडा पाहिला तर तो 395 एवढा आहे. तर विजयासाठी एनडीएच्या उमेदवाराला 394 मतांची गरज आहे. बीजद, वायएसआर काँग्रेस, बसपा आणि टीडीपीनेही एनडीएमच्या उमेदवाराला समर्थन देण्याची घोषणा केली आहे. या पक्षांचे संसदेत जवळपास 67 सदस्य आहेत. लोकसभेत शिवसेनेचे 13 खासदार भाजपासोबत आहेत. त्यामुळे एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना 65% पेक्षा जास्त मतं मिळतील, अशी शक्यता आहे.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. राजस्थानमधील किठाणा गावातील शेतकरी कुटुंबात जगदीप धनखड यांचा जन्म झाला. राजस्थानमधील सैनिकी स्कूलमधून त्यांचं शिक्षण झालं. त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं असून राजस्थान हायकोर्टात त्यांनी प्रसिद्ध वकील म्हणून ख्याती कमावली. त्यानंतर सुप्रीम कोर्टातही ते नामांकित वकील म्हणून ओळखले गेले. 1989 मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. यावेळी ते सुप्रीम कोर्टात वकील होते. 1990 ते 1993 पर्यंत ते परराष्ट्र खात्यात मंत्री होते. त्यानंतर ते राजस्थान विधानसभेचे सदस्य झाले. जुलै 2019 मध्ये त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतली.
मूळ कर्नाटकमधील नेत्या मार्गारेट अल्वा यांनीही पाच वेळा खासदारकी भूषवली आहे. काँग्रेसच्या महासचिव पदी त्यांनी चोख भूमिका पार पाडली आहे. महिला सक्षमीकरण संबंधी धोरणांची ब्लू प्रिंट बनवण्यात तसेच केंद्र व राज्य सरकारांनी ती अंमलात आणण्यात मार्गारेट अल्वांचे योगदान मोठे आहे. 6 ऑगस्ट 2009 ते 14 मे 2012 पर्यंत त्या उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. त्यानंतर 12 मे 2012 पासून त्या राजस्थानच्या राज्यपाल आहेत.
आजच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वांचा विजय होण्याची शक्यता खूप कमी आहे. तृणमूल काँग्रेसने मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली आहे. आपल्याकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर शिवसेनेने यंदा युपीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरीही पक्षातच मोठी फूट पडली आहे. बसपाच्या मायावतींनीही एनडीएमच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. एकूणच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांप्रमाणेच जगदीप धनखड यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. शुक्रवारी भाजपने संसदभवनात खासदारांसाठी बैठक बोलवली. यात मतदान करण्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले गेले.