अजित पवारांना शह, पवारांकडून सुप्रिया सुळेंच्या हातांना बळ
सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षतेखाली सोशल मीडिया ते महिला सेल, राज्यस्तरीय डॉक्टर सेल आणि पार्टी फ्रंटलच्या बैठका घेतल्या जात आहेत. सुप्रिया सुळे राज्यात लक्ष घालत असल्याचं हे द्योतक मानलं जातंय.
मुंबई : पवार कुटुंबात आलबेल नसल्याचा दावा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. हा दावा खरा ठरत असल्याचं दिसतंय. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार सुप्रिया सुळे यांचे हात आणखी बळकट करत पक्षाचे नेते अजित पवार यांना बाजूला केल्याचं चित्र आहे. सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षतेखाली सोशल मीडिया ते महिला सेल, राज्यस्तरीय डॉक्टर सेल आणि पार्टी फ्रंटलच्या बैठका घेतल्या जात आहेत. सुप्रिया सुळे राज्यात लक्ष घालत असल्याचं हे द्योतक मानलं जातंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सतत ईव्हीएमवर टीका करत आहेत. पण अजित पवारांकडून मात्र ईव्हीएमचं समर्थन केलं जातं. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर काका-पुतण्यांचं विरुद्ध मत समोर आलं होतं. अजित पवारांनी ईव्हीएमला कोणताही दोष दिला नाही, तर शरद पवारांनी पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं होतं. यामुळेच अजित पवारांना बाजूला केलं जात असल्याचं बोललं जातंय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्रंटल आणि सेलच्या प्रमुखांशी आज संवाद साधला. pic.twitter.com/MwX9TTwgSi
— Supriya Sule (@supriya_sule) June 13, 2019
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामतीच्या पाणीप्रश्नी नुकतीच शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघे निघून गेले. मात्र अजित पवार मागेच थांबले होते. अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबत नंतर अर्धा तास चर्चा केली होती. अजित पवार यांनी कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली तो विषय अद्यापही गुलदस्त्यात आहे.
ईव्हीएमवर काका-पुतणे आमनेसामने
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीत ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा संशय व्यक्त केला. तर दुसरीकडे अजित पवार यांनी या नेत्यांसमोरच ईव्हीएमवरील आरोप खोडून काढले. जिंकल्यावर ईव्हीएमवर संशय नसतो, पण पराभवानंतरच का? असा सवाल करत कामाला लागण्याच्या सूचना अजित दादांनी केल्या.
याच कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. ईव्हीएम संदर्भात मी तज्ञांकडून जाणून घेतलं. एव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांच्यात काही गडबड नाही, तर बाजूला बसलेल्या अधिकाऱ्याच्या मशीनमध्ये गडबड आहे. तुम्हाला व्हीव्हीपॅटमध्ये दिलेलं मत दिसतं, पण त्या अधिकाऱ्याकडे काय गेलं हे तुम्हाला काय माहित? आणि मत मोजणीला पुन्हा तेच घेतलं जातं. आम्ही दिल्लीला जाऊन यावर बैठक घेणार आहोत. जर असंच सुरू राहिलं तर लोक कायदा हातात घ्यायला घाबरणार नाहीत, असंही शरद पवार म्हणाले.