मुलाच्या ‘फलंदाजी’वर प्रश्न, कैलाश विजयवर्गीयांनी पत्रकाराची लायकी काढली
भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांनी इंदूर पालिका अधिकाऱ्याला बॅटने जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आमदार आकाश विजयवर्गीय हे भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका खासगी न्यूज चॅनलच्या पत्रकाराने कैलाश विजयवर्गीय यांना काही प्रश्न विचारले. यावर कैलाश विजयवर्गीय संतापले आणि त्यांनी त्या पत्रकाराची लायकी काढली.
इंदूर : भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांनी इंदूर पालिका अधिकाऱ्याला बॅटने जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आमदार आकाश विजयवर्गीय हे भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका खासगी न्यूज चॅनलच्या पत्रकाराने कैलाश विजयवर्गीय यांना काही प्रश्न विचारले. यावर कैलाश विजयवर्गीय संतापले आणि त्यांनी त्या पत्रकाराची लायकी काढली.
तुमच्या मुलाने कायदा हातात घेत पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली, त्यांची ही वागणूक योग्य आहे का? यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे, असा प्रश्न पत्रकाराने कैलाश विजयवर्गीय यांना विचारला. यावर माझा मुलगा कुठलंही चुकीचं काम करणार नाही, असं कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
त्यानंतर पत्रकाराने पुन्हा विचारले की, व्हिडीओमध्ये आकाश हे अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत. यावर कैलाश विजयवर्गीय संतापले आणि त्यांनी पत्रकाराला विचारले की तुम्ही न्यायाधीश आहात का? वारंवार पत्रकार तेच प्रश्न विचारत असल्याने कैलाश विजयवर्गीय यांना राग अनावर झाला आणि त्यांनी पत्रकाराची लायकी काढली. “तुझी लायकी काय आहे”, असं कैलाश विजयवर्गीय पत्रकाराला म्हणाले.
प्रकरण काय?
इंदूरच्या गंजी कंपाऊंड परिसरातील एका इमारतीचे अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका अधिकारी तिथे गेले होते. यावेळी आमदार आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्याला धमकावलं. त्यांच्याशी वाद घातला आणि एवढ्यावरच न थांबता आमदार आकाश यांनी चक्क बॅटने त्या अधिकाऱ्याला मारहाण केली.
पालिका अधिकारी जून्या इमारतींना निर्मनुष्य करुन त्या पाडणार होते, जेणेकरुन कुठलीही दुर्घटना होऊ नये.
पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार आकाश विजयवर्गीय यांच्यावर कलम 353 , 294 , 506, 147, 148 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश विजयवर्गीय हे इंदूर-3 चे आमदार आहेत. ते यावेळी पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
Madhya Pradesh: Case registered against BJP MLA Akash Vijayvargiya and 10 others for thrashing a Municipal Corporation officer in Indore. Akash is the son of senior BJP leader Kailash Vijayvargiya. (File pic) pic.twitter.com/KbjTIx6uRL
— ANI (@ANI) June 26, 2019
आकाश विजयवर्गीय यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल
या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. आकाश विजयवर्गीय यांना अटक करुन इंदूरच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने आकाश यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आकाशसोबतच 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश यांना न्यायालयात नेताना पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. कारण, तिथे मोठ्या प्रमाणात आकाश यांचे समर्थक जमले होते. ते सरकार आणि पालिकेविरोधात घोषणा देत होते.
आकाश विजयवर्गीय विवादास्पद वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत
आकाश विजयवर्गीय हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. लोकसभा निवडणुकांदरम्यान आकाश यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ‘राहुल गांधी पहिले पप्पू होते, आता गाढवांचे राजे झाले आहेत, असं आकाश विजयवर्गीय म्हणाले होते. यावर काँग्रेसनेही त्यांच्यावर टीका केली होती.
पाहा व्हिडीओ :