‘बॅट्समन’ भाजप आमदाराचा जामीन अर्ज फेटाळला, 7 जुलैपर्यंत तुरुंगात मुक्काम
भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या आमदार पुत्राने गुंडगिरी करत पालिका अधिकाऱ्याला बॅटने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आकाश विजयवर्गीय असं या भाजप आमदाराचं नाव आहे. या घटनेनंतर आमदार आकाश यांच्याविरोधात संबंधित पालिका अधिकाऱ्य़ाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
इंदूर : भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या आमदार पुत्राने गुंडगिरी करत पालिका अधिकाऱ्याला बॅटने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आकाश विजयवर्गीय असं या भाजप आमदाराचं नाव आहे. या घटनेनंतर आमदार आकाश यांच्याविरोधात संबंधित पालिका अधिकाऱ्य़ाने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर आकाश विजयवर्गीय यांना मारहाणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्यांना इंदूरच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता पाहाता आकाश यांचा जामीन फेटाळून लावला आणि त्यांची थेट तुरुंगात रवानगी केली. न्यायालयाने आकाश यांना 7 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी आमदार आकाश विजयवर्गीय यांच्यावर कलम 353 , 294 , 506, 147, 148 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश विजयवर्गीय हे इंदूर-3 चे आमदार आहेत. ते यावेळी पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
प्रकरण काय?
पालिकेचे अधिकारी इंदूरच्या गंजी कंपाऊंड परिसरातील एका इमारतीचे अतिक्रमण हटवायला गेले होते. दरम्यान, आमदार आकाश विजयवर्गीय यांनी त्या ठिकाणी येऊन पालिका अधिकाऱ्यांना धमकी देत 5 मिनिटात तेथून जाण्यास सांगितलं. यावेळी आमदार विजयवर्गीय यांच्या समर्थकांनी पोकलेन मशीनची चावी काढून घेतली. त्यानंतर पालिका अधिकारी आणि आमदार विजयवर्गीय यांच्यात शाब्दिक वाद झाला.
वाद सुरु असतानाच आमदार विजवर्गीय यांचा पारा चढला आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला चक्क बॅटने मारण्यास सुरुवात केली. यानंतर बराच गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद थांबवला. माध्यमांशी बोलताना आमदारांनी आपण रागात असल्याने मारहाण केल्याचं सांगितलं. मात्र, ही केवळ सुरुवात आहे. यापुढेही अशाचप्रकारे विनंती, निवेदन आणि मग दणादण या पद्धतीने काम करु, असा इशाराही विजयवर्गीय यांनी दिला.
या प्रकरणानंतर, “कितीही मोठा नेता का असेना, कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल”, असं आश्वासन मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांनी दिलं होतं. त्यानंतर आकाश विजयवर्गीय यांच्या विरोधात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांना अकट करण्यात आली.
न्यायालयाने विजयवर्गीय यांचा जामीन फेटाळून त्यांना 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे, आकाश यांची तुरुंगात रवानगी करण्यात आल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे इंदूरचं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडीओ :